निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणी तिथे वस्ती असा आजपर्यंतचा मानवी इतिहास सांगतो. आतापर्यंत पाण्याचा स्रोत पाहूनच माणसाने वस्ती केली, शहरे वसविली. आधुनिक जगात हे चित्र बदलले. माणसाकडे तंत्रज्ञान आले आणि नदीचे पाणी अडवून मोठा जलसाठा करण्याचे, ते दूरपर्यंत पोहचविण्याचे किंवा भूजलाचा उपसा करण्याचे तंत्र आपल्याला अवगत झाले. आज जेथे मोठमोठे उद्योग व रोजगाराची व्यवस्था असेल तेथे शहरे वसतात व पाण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे नदी-नाल्यांची व पावसाच्या थेंबाची किंमत लोकांना कळत नाही. स्रोताची पर्वा न करता पाण्याचा वारेमाप वापर करणे सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बिकट होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. केवळ नागपूर जिल्ह्याचा व त्यातही आसपासच्या जलप्रकल्पातील जलसाठा क्षमतेपेक्षा निम्म्यावर आल्याचे दिसून येत असून, हे चित्र भविष्यातील धोकादायक परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे.
आसपासच्या धरणातील जलसाठ्याची परिस्थितीशासकीय आकडेवारीनुसार नागपूरच्या आसपास असलेल्या धरणामधील जलसाठा क्षमतेपेक्षा घटल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या २० टक्के क्षमतेनुसार ७.४० दशलक्ष घनलिटर जलसाठा असणे गरजेचे आहे. मात्र २०१७ च्या अंतापर्यंत या धरणात केवळ १.५१ दलघमी पाण्याचा साठा उपलब्ध आहे. बावनथडी प्रकल्प २.१७ दलघमी क्षमतेवरून ९८ हजार दलघमीवर आले आहे. खिंडसी डॅमची क्षमता १.०३ दलघमी असून, त्यातही केवळ २३ हजार दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. वर्ध्याच्या बोर धरणाची क्षमता १.२७ दलघमी आहे, मात्र त्यात ८३ हजार दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. २.१७ दलघमी क्षमता असलेल्या निम्न वर्धा प्रकल्पात १.२१ दलघमी जलसाठा उपलब्ध असल्याचे आकडे आहेत. अशाचप्रकारे चंद्रपूरचे आसोलामेंढा, गडचिरोलीचे दीना, गोंदियाचे इटियाडोह, कालीसरार, पुजारीटोला व सिरपूर, नागपूरचे कामठी खैरी, नांद, तोतलाडोह या धरणातही क्षमतेपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध आकडेवारी ही संकटाचे चित्र स्पष्ट करणारीच आहे व याकडे शासनाचे व सामान्य नागरिकांनीही लक्ष वेधणे आवश्यक आहे.
शहरातील तलावही संकटातशहरात असलेल्या तलावांपैकी काही मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. अंबाझरी, फुटाळा व गांधीसागर तलावात उन्हाळ्याच्या दिवसात कसातरी जलसाठा उपलब्ध राहतो. यातील गांधीसागर प्रदूषणामुळे, फुटाळा तलाव येथील जलकुंभी वनस्पतीमुळे संकटात आला आहे. दुसरीकडे सोनेगाव, सक्करदरा व नाईक तलाव उन्हाळ्यात सुकलेल्या अवस्थेत असते. यातील सोनेगाव तलावात वसाहतीमुळे पावसाचे पाणी येण्याचे मार्गही बंद झाले आहेत. काही वर्षाआधी दिसणारे संजय गांधी तलावाचे अस्तित्वच संपले आहे. महापालिकेने ४.२५ कोटी खर्च करून पांढराबोडी येथे तयार केलेल्या कृत्रिम तलावाचा प्रकल्प सपशेल अपयशी ठरला आहे.पृथ्वीवरील पाण्याची उपलब्धतापृथ्वीच्या भूपृष्ठाच्या ७०.८० टक्के भूभाग पाण्याने आणि २९.२० टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे. जमीन आणि पाणी यांच्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण अधिक असले तरी मानवाला वापरण्यायोग्य पाण्याचे प्रमाण कमी आहे. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या ९७ टक्के पाणी सागरात आहे. सागरीसंपत्ती सोडता समुद्राचे पाणी क्षारयुक्त असल्याने उपयोगशून्य आहे. शुद्ध पाण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के एवढेच आहे. या ३ टक्केपैकी ६९ टक्के हे हिमनगात व्यापले आहे. त्यातील ३० टक्के हे भूजल तर ०.३ टक्के नद्या, तलाव, विहिरीमध्ये साचले आहे. यावरून मानवी उपयोगायोग्य पाणी केवळ ०.०३ टक्के एवढेच आहे.कमतरता व प्रदूषणाचे दुहेरी संकटपाण्याचे संकट कमतरता आणि अशुद्धता अशा दुहेरी बाजूने भेडसावत आहे. औद्योगिक प्रदूषण व शहरात घराघरातून निघणारे सांडपाणी हे जलप्रदूषणाचे दोन मुख्य कारणे आहेत.देशातील बहुतेक उद्योगधंदे हे नद्यांच्या किनारी प्रदेशात आहेत व त्यामुळे कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले जाते व त्यामुळे नदीतील शुध्द पाणी प्रदूषित होते. रासायनिक खतांचा अमर्याद वापर, कीटकनाशके, जंतुनाशके व तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे व त्यांच्या पाण्यातील प्रवेशामुळे पाणी प्रदूषित होत आहे. मात्र औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कायदे आहेत, मात्र सांडपाण्याबाबत अजूनही उदासिनता आहे.नागपूर शहराचा विचार करता शहरातून दररोज ५५० दलघमी सांडपाणी बाहेर पडते. यातील महाजेनकोद्वारे १३५ एमएलडी तर मनपाद्वारे २०० एमएलडीवर प्रक्रिया केली जाते. उर्वरित २२५ एमएलडी पाणी नाल्याद्वारे वाया जात असून भूजल प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. जुन्या सिवेज लाईनही भूजल प्रदूषणाचे कारण ठरले आहे.जलसंकटनागपूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व व मान्सूननंतर पाण्याच्या पातळीत १० ते ४ मीटरची तफावत दिसून येते. मात्र ही तफ ावत दरवर्षी अधिक धोकादायक होत असून भूजल पातळी २ ते ३ मीटरने खाली जात आहे. १० ते १५ वर्षाआधी जेवढा जलसाठा उपलब्ध होता, तेवढाच आजही आहे. नागपूर शहर झपाट्याने वाढत आहे व लोकसंख्या ३५ ते ४० लाखाच्या घरात गेली आहे. या तुलनेत पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. वस्त्यांचा विस्तार होताना बांधकामासाठी पाण्याची गरज वाढली आहे. बिल्डर्सकडून बोअर करून अमर्याद रुपाने पाण्याचा उपसा केला जात आहे. काही भागात १०० फुट तर काही भागात २००-२५० फुट खोलातून पाण्याचा उपसा केला जातो. परंतु त्या प्रमाणात पुनर्भरण होत नाही. यासह इतर बांधकामे, उद्योगांसाठी लागणारे पाणी अशा प्रत्येक ठिकाणी पाण्याचा वारेमाप वापर होत आहे.महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सर्वेक्षणानुसार, आपण जे जमिनीतील पाणी वापरतो ते ५० ते १०० वर्ष अगोदर जमिनीत जिरलेले असू शकते. जमिनीत पाणी जिरतांना १०० फुट खोलानंतर १ फुट खाली जाण्यासाठी पाण्याला ४ महिने (१२० दिवस) लागतात. यावरून जमिनीत पाणी खोल जाण्याची कल्पना यऊ शकते. नैसर्गिक स्रोत हाच एकमेव पर्याय असल्याने पाणी किती आणि कसे वापरावे याचा विचार प्रत्येकाने केल्याशिवाय गत्यंतर नाही.