योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांपासून ओझोनच्या घटणाऱ्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर मंथन सुरू आहे. मात्र उंचावर असलेला ओझोन एकीकडे आपल्यासाठी फायदेशीर असला, तरी वाहनांमधून उत्सर्जित होणाºया काही वायूंमुळे जमिनीच्या पातळीवर तयार होणारा ‘ओझोन’ वायू तितकाच धोकादायक ठरू शकतो. उपराजधानीतील वाढते वायूप्रदूषण या धोकादायक ‘ओझोन’च्या वाढीसाठी अनुकूल असून योग्य पावले उचलली नाही तर ही बाब भविष्यातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते, असे मत जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.उंचीवर असलेल्या वातावरणातील ‘ओझोन’चा पट्टा हा साधारणत: जमिनीपासून २५ ते ५० किलोमीटर अंतरावर असतो. विविध वातानुकुलित उपकरणांमध्ये ‘सीएफसी’चा (क्लोरोफ्लुरोकार्बन) उपयोग करण्यात येतो. या ‘सीएफसी’ची इतर घटकांसोबत प्रक्रिया होणे अशक्य असते. मात्र ओझोनच्या संपर्कात आल्यानंतर मात्र लगेच प्रक्रिया होते व ओझोन नष्ट होतो. यामुळे सूर्यापासून येणारी ‘अल्ट्राव्हॉयलेट’ किरणे थेट पृथ्वीवर येतात व त्यामुळे तापमान वाढ, त्वचेचे विविध आजार होण्याचा धोका असतो. यामुळेच ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका निर्माण झाल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मात्र जगातील अनेक शहरांमध्ये जमिनी पातळीवर निर्माण होणारा ‘ओझोन’ वायू धोकादायक ठरु लागला आहे. वाहने तसेच ऊर्जा प्रकल्पांमधून ‘नायट्रोजन आॅक्साईड’ तसेच ‘नायट्रोजन डायआॅक्साईड’ मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो. या वायूंची सूर्यप्रकाश किंवा गरम वातावरणात ‘व्होलाटाईल आॅरगॅनिक कंपाऊन्ड्स’सोबत प्रक्रिया झाल्यावर जमिनीजवळील वातावरणात ओझोनची निर्मिती होते.
जास्त प्रमाण हवामानासाठी धोकादायकजमिनीच्या पातळीवर साधारणत: १ क्यूबिक मीटर हवेत ०.१८ मिलीग्रॅमपेक्षा कमी ‘ओझोन’ असेल तर तो धोकादायक ठरत नाही. मात्र याहून जास्त प्रमाण निश्चितच विविध संकटांना आमंत्रण देणारे असते. यामुळे पिकांना फटका बसू शकतो. अनेक झाडे अचानकपणे सुकतात. शिवाय नायलॉन, रबरच्या वस्तूदेखील खराब होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्यावर याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो, अशी माहिती एका राष्ट्रीय संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
‘सीएफसी’ला पर्याय उपलब्धदरम्यान, उंच वातावरणातील ‘ओझोन’च्या पट्ट्याचे संरक्षण करणे हे सीएफसीच्या कमी वापरातूनच शक्य आहे. वातानुकूलित उपकरणांचा वापर वाढला असताना आता ‘सीएफसी’ ऐवजी ‘एचसीएफसी’ (हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन) वापरण्यात येतात. ‘सीएफसी’च्या तुलनेत यांच्यापासून ‘ओझोन’ला कमी धोका असतो. केवळ ‘अंटार्टिका’मध्ये ‘ओझोन’चा थर कमी होत असल्याचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात ऋतूमान आणि अक्षांश रेखांशानुसार ‘ओझोन’च्या थरात कमी जास्त फरक होत असतो, अशी माहिती संबंधित वैज्ञानिकांनी दिली.
जमिनी पातळीवरील ‘ओझोन’मुळे होणारे धोके
- श्वसनास अडथळे
- श्वसनाच्या आजारांत वाढ
- खोकला आणि घशाचे विकार
- अस्थमा, एम्फिसिमा तसेच ब्रॉन्कायटीसची शक्यता
- पिकांवर प्रतिकूल परिणाम
- अचानक झाडे सुकणे किंवा वाढ खुंटणे