निशांत वानखेडे/सचिन लुंगसे
नागपूर/मुंबई : हवामान बदलाचे संकेत लक्षात घेता महाराष्ट्रकरांसाठी बॅड न्यूज व गुड न्यूज दाेन्ही आहेत. मागील ३० वर्षांच्या तुलनेत २०५० पर्यंत प्रदूषणाच्या तीव्रतेनुसार उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. गुड न्यूज हे आहे की, देशात राजस्थान आणि गुजरातसह महाराष्ट्रात पावसाच्या वार्षिक हंगामात ३ ते ९ दिवसांची वाढ हाेणार आहे. सर्व जिल्ह्यात पावसाचे प्रमाणही वाढणार असून अत्याधिक पावसाच्या घटनांमध्येही वाढ हाेणार आहे.
आयपीसीसी, भारतीय हवामान विभाग व जागतिक हवामान अभ्यासक संस्थांनी १९९० ते २०१९ या ३० वर्षात बदललेल्या हवामानाचा अभ्यास करून २०३० पर्यंतचे प्राेजेक्शन ठेवत २०५० पर्यंतचे अनुमान मांडले आहे. सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी या संशोधन संस्थेने या अहवालातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आहे.
मान्सूनचे ३ ते ९ दिवस वाढतील
- प्रदूषणाची तीव्रता (कार्बन उत्सर्जन) सध्याच्या प्रमाणापेक्षा वाढली, तर राज्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस ३ ते ९ दिवसांनी वाढेल.
- वाशिम ९, जालना ८, चंद्रपूर, गडचिराेली, अहमदनगर, सातारा, नंदूरबार ७ दिवस, नागपूर, अकाेला, बुलडाणा, पुणे, सांगली, वर्धा ५ दिवस, उर्वरित जिल्ह्यात २ ते ४ दिवस.
- वाढत्या प्रदूषणाच्या अनुमानानुसार सर्व जिल्ह्यांत २ ते ८ दिवस पाऊस वाढणार. मुंबई ७, चंद्रपूर, अहमदनगर, गडचिरोली, जालना, सातारा ६ दिवस.
- पश्चिम महाराष्ट्रात सरासरी पावसाचे प्रमाण १ ते २९ टक्क्यांनी वाढेल. गाेंदिया १ टक्के तर पुण्यात २९ टक्क्यांनी वाढेल. अत्याधिक प्रदूषण झाले तर गाेंदिया ३ टक्के व पुणे ३४ टक्के. चंद्रपूर १५ टक्के.
- सर्वाधिक पावसाची सरासरी वाढणारे जिल्हे- अकाेला १७ ते २५ टक्के, भंडारा १५ ते २० टक्के, नाशिक १५ ते १६ टक्के, रत्नागिरी १७ ते २० टक्के, सातारा १९ ते २४ टक्के, साेलापूर १५ ते १९ टक्के, वर्धा १९ ते २२ टक्के, यवतमाळ १७ ते १९ टक्के.
अति पावसाचा धाेका
- भंडारा वगळता सर्व जिल्ह्यात अति पावसाच्या (५१-१०० मिमी/दिवस) घटनांमध्ये १ ते ५ दिवसाची वाढ.
- सिंधुदुर्ग ५, बुलडाणा ४, हिंगाेली, लातूर, बीड, साेलापूर, औरंगाबाद ३ घटना. २० जिल्ह्यांत २ घटना तर ८ जिल्ह्यांत १ घटना.
- अति प्रदूषणाच्या परिस्थितीत अति पावसाच्या घटना २ ते ८ दिवस वाढणार. सिंधुदुर्ग ८, बुलडाणा, हिंगाेली ५, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, काेल्हापूर, नांदेड, परभणी, सांगली, साेलापूर, वाशिम ४ घटना. १५ जिल्ह्यात ३ तर ८ जिल्ह्यात २ घटना.
- अतिशय माेठ्या पावसाच्या घटना मुंबईत ३, तर उर्वरित जिल्ह्यात २ घटना वाढतील.
प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.
तापमान वाढीमुळे आणि हवामान बदलामुळे कमी काळात अधिक पाऊस पडेल. नागरिकाच्या विस्थापनाच्या समस्या निर्माण होतील. पिकांची नासाडी व कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान होईल. वने, वन्यजीव आणि एकूणच परिसंस्थेवर परिणाम होईल. वेगवेगळ्या विषाणू व जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढून आराेग्यावर गंभीर परिणाम हाेतील. कामाचे तास, अर्थव्यवस्था आणि विकासकामांवर गंभीर परिणाम दिसून येतील. त्यामुळे नियाेजन करण्याची अत्याधिक आवश्यकता आहे.
- प्रा. सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक