‘के.जी. देशपांडे मेमोरियल सेंटर’चे यश : एकाच वेळी झाली ‘बायपास’ आणि ‘स्टेन्टिंग’नागपूर : हृदयाला रक्तपुरवठा करणारी ‘ब्लॉक’ झालेली रक्तवाहिनी, त्यात वाढलेला रक्तदाब व त्यामुळे उजव्या किडनीला जोडणाऱ्या रक्तवाहिनीचे आकुंचन होऊन झालेले ‘स्टेनॉसिस’. अशास्थितीत नेमका कशाचा उपचार अगोदर करावा, असा संभ्रम वैद्यकीय तज्ज्ञांना पडतो. परंतु एकाच वेळी तिन्ही समस्यांचे निराकरण करणारी ‘हायब्रीड’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्याचा मान नागपूरकर डॉक्टरांनी मिळविला आहे. ‘डॉ. के.जी. देशपांडे मेमोरियल सेंटर’ येथे मागील पंधरवड्यात ही ऐतिहासिक ‘हायब्रीड’ शस्त्रक्रिया करण्यात आली. जगातील ही अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा ‘सेंटर’कडून करण्यात आला आहे.अकोला येथील ५१ वर्षीय व्यक्तीला अनुवांशिकपणामुळे उच्चरक्तदाबाची समस्या होती. परंतु यामुळे त्यांच्या उजव्या किडनीची धमनी आकुंचित झाली होती. त्यातच त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्येदेखील मोठे ‘ब्लॉकेजेस’ आढळले होते. अशास्थितीत ‘बायपास’ शस्त्रक्रिया करण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. परंतु सामान्यपणे अशा प्रकरणांमध्ये अगोदर ‘बायपास’ करून काही कालावधीने किडनीच्या ‘स्टेनॉसिस’संदर्भात शस्त्रक्रिया करण्यात येते. परंतु उच्चरक्तदाबामुळे ‘बायपास’दरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘ग्राफ्टस्’चे वयोमान कमी होण्याचा धोका असतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन हृदय शल्यचिकित्सक सर्जन डॉ. पी.के. देशपांडे, डॉ. स्वप्नील देशपांडे, भूलतज्ज्ञ डॉ. एस.के. देशपांडे व ‘रेडिओलॉजिस्ट’ डॉ. श्रीकांत कोठेकर यांनी चर्चा केली. ‘सेंटर’मध्ये अत्याधुनिक अशी ‘हायब्रीड कॅथलॅब’ उपलब्ध असल्यामुळे एकत्रितपणे दोन्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगात अशी शस्त्रक्रिया कधीच न झाल्यामुळे हे त्यांच्यासमोर एक आव्हान होते. परंतु तज्ज्ञांच्या टीमने कौशल्य पणाला लावत हे आव्हान पूर्ण करून दाखविले. शस्त्रक्रियेनंतर आठवडाभरातच संबंधित रुग्णाला सुटी देण्यात आली व आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा रक्तदाबदेखील आटोक्यात होता.या ‘टीम’मध्ये डॉ. स्वप्नील देशपांडे, डॉ. पी.के. देशपांडे, डॉ. एस.के. देशपांडे, डॉ. श्रीकांत कोठेकर यांच्यासोबत डॉ. डी.व्ही. गुप्ता, डॉ. ज्योती पान्हेकर, डॉ. प्रभाकर देशपांडे, डॉ. एम.के. देशपांडे, इर्शाद अहमद, डॉ. डी.आर. बाहेकर, डॉ. मनीषा देशपांडे व डॉ. प्राजक्ता कायरकर यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)
जगातील पहिली ‘हायब्रीड’ शस्त्रक्रिया नागपुरात!
By admin | Published: August 27, 2015 2:57 AM