सावनेर/कामठी/हिंगणा/नरखेड/उमरेड/काटोल/कुही/रामटेक/कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ६९९ रुग्णांची नोंद झाली तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ३४,९३० इतकी झाली आहे तर ८०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या वाढीमुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सावनेर तालुक्यात १३३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३३ तर ग्रामीण भागातील १०० रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ११४ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील महादुला व कोराडी परिसराची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. बुधवारी कामठी शहरात (२४), कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड (७) तर ग्रामीण भागात महादुला (३३), कोराडी (२६), गुमथळा (६), पांजरा (५), येरखेडा (३),रनाळा, वडोदा प्रत्येकी २ तर अजनी, कडोली, खैरी, घोरपड, जाखेगाव, भिलगाव येथे प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ८५५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे (११), डिगडोह (७), नीलडोह (५), हिंगणा (३), मोंढा व सावळी बिबी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४७६७ इतकी झाली आहे. यातील ४०२४ जण कोरोनामुक्त झाले तर १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रामटेक तालुक्यात १८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरात राजाजी वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड व गांधी वॉर्ड येथे प्रत्येकी ३, महात्मा फुले वॉर्ड, आंबेडकर वाॅर्ड, अंबाळा वार्ड व रामालेश्वर वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात शीतलवाडी, मनसर, वडांबा, सालई व दाहोदा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १३१५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १०९१ जण कोरोनामुक्त झाले तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कुही तालुक्यात ६८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ८०६ इतकी झाली आहे.
नरखेड तालुक्यात १३ रुग्णांची भर पडली. यात ३ रुग्ण शहरातील तर १० ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४६ तर शहरात ४४ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात सिंजर येथे ४, मोवाड व थाटूरवाडा येथे प्रत्येकी २ तर महेंद्री व भिष्णूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. उमरेड तालुक्यात बुधवारी १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी ६ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर ग्रामीणमध्ये धोका वाढला
कळमेश्वर तालुक्यात आणखी ३९ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रात १२ रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात धापेवाडा व परसोडी येथे प्रत्येकी ४, गोंडखैरी (३), मोहपा, मांडवी, पिपळा येथे प्रत्येकी दोन तर सेलू, सावंगी, उपरवाही, घोराड, सोनेगाव, वरोडा, सावळी बु., भडांगी, खैरीहरजी, चाकडोह येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल शहरात संक्रमण अधिक
काटोल तालुक्यात ३८ रुग्णांची नोंद झाली. यात ३२ रुग्ण शहरातील तर ६ ग्रामीण भागातील आहेत. काटोल शहरामध्ये जानकीनगर येथे ८, पंचवटी (४), फल्ली मार्केट, दोडकीपुरा येथे प्रत्येकी तीन, रेल्वे स्टेशन, नबीरा ले-आउट, राऊतपुरा, अर्जुन नगर, धंतोली येथे प्रत्येकी दोन तर गळपुरा, देशमुखपुरा, वडपुरा, पेठबुधवार येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये मसली येथील दोन तर गोंडीदिग्रस, पारडसिंगा, वंडली (वाघ), खापरी (केने) येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.