लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे हजारो वर्षे धर्माच्या गुलामीत खितपत हीन जीवन लादण्यात आलेल्या अस्पृश्यांचा मुक्तीदिन. रक्ताचा एक थेंबही न सांडता अभूतपूर्व अशा धम्मक्रांतीने तथागत बुद्धाच्या धम्माशी जोडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अज्ञानाच्या अंधक्कारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणले. १९५६ ला घडलेल्या त्या धम्मक्रांतीचा आज ६२ वा वर्धापन दिन. अशोक विजयादशमी दिनी बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती केली, त्यामुळे दसऱ्याचा दिवस महत्त्वपूर्ण मानून हा सोहळा साजरा केला जातो. मात्र धम्मदीक्षेची तारीखही महत्त्वाची मानून दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर एकत्रित येतात.सोमवारी धम्मचक्र प्रवर्तनाचा ६२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या सोहळ्यात जगभरातील लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. मात्र १४ ऑक्टोबरलाही नागपूर जिल्हा व आसपासचे हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर पोहचून तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीक्षाभूमीला अभिवादन करीत असतात. त्यामुळे सोमवारीही आंबेडकरी अनुयायांचे पाय दीक्षाभूमीकडे वळणार आहेत.महामानवाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच लोकांच्या रांगा लागण्याची शक्यता लक्षात घेता व्यवस्था करण्यात आली आहे. असंख्य लोक कुटुंबासह तर अनेक वस्त्यातील बौद्ध उपासक, संस्था व संघटना रॅली काढून दीक्षाभूमीकडे येत असतात. शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या उपासकांची गर्दी येथे होते. विशेष म्हणजे शेकडो कुटुंब रात्रीच्या वेळीही दीक्षाभूमीच्या परिसरात स्नेहभोजन घेत हा दिवस साजरा करीत असतात. यासोबतच संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होणार आहे. शहरात सर्वत्र वस्त्या, बुद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना व धार्मिक आयोजनासह विविध विषयांचे व्याख्यान, प्रबोधन व बुद्ध भीम गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून धम्मचक्र प्रवर्तनाचा सण साजरा केला जाईल.
नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांचे आज नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:48 AM