लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. परंतु सवलती जातील या भीतीमुळे आजही अनेकजण धर्मासोबतच जातीचाही उल्लेख करतात. असे करू नका. जातीच्या भरवशावर गल्लीत वावरण्यापेक्षा बौद्ध म्हणून जगात वावरा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडक यांचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक राजरत्न अशोक आंबेडकर यांनी येथे केले.
विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी कुकडे ले-आऊट येथील पवार सभागृहात ‘भारतीय बौद्धांची सद्य:स्थिती’ यावर मार्गदर्शन करताना ते बोलत हाेते. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक अनिल जवादे, सेंट पॉल महाविद्यालयाचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, अरुण गाडे, सुनील तायडे, डी.एस. तायडे, रवप पोथारे, संजय सायरे, संजय गोडघाटे, विलास गजभिये, सोनिया गजभिये, विनेश शेवाळे, शैलेश जांभुळकर, राजेश ढेेंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
राजरत्न आंबेडकर म्हणाले, सध्या देशात बौद्धांची संख्या ८० लाखांपेक्षा अधिक असूनही शासनदफ्तरी बौद्धांची आकडेवारी ०.६ टक्के एवढीच आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे अनुसूचित जातीच्या नावाने मिळणारे आरक्षण रद्द होऊ नये ही भीती होय. बौद्ध लोकांनी केवळ बौद्ध म्हणूनच नोंद केली तर ०.६ टक्के असलेली आकडेवारी ही ६.० टक्के इतकी होईल. त्यामुळे मनात भीती ठेवू नका. एप्रिल महिन्यापासून जनगणना सुरू होत आहे. तेव्हा धर्माच्या रकान्यात केवळ बौद्ध म्हणून उल्लेख करा. बौद्ध असा उल्लेख केल्यानंतर दुसरा कुठलाही उल्लेख करू नका, असे आवाहन त्यांनी केले.