नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँक ऑफ महाराष्ट्रची १.८९ कोटी रुपयांची फसवणूक करणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी गुलाम अशरफी याचा आणखी एक अपराध समोर आला आहे. शस्त्राचा धाक दाखवून त्याने फायनान्स कंपनीच्या ग्राहकांकडून ३.४६ कोटींची २६ वाहने हडपली. या प्रकरणात पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशाप्रकारे त्याने आणखी किती लोकांना गंडा घातला आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.
गुलाम अशरफी गरीब वाहनचालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचा. जेव्हा ते बँकेचे हस्ते भरण्यास अपयशी ठरायचे, तेव्हा सुरूवातीला त्यांना बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचा आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटिंग करून जप्त झालेले वाहन लिलावात कमी किमतीत खरेदी करायचा. या ‘मोडस ऑपरेंडी’ने त्याने अनेक ट्रक्स, जेसीबी, एसयूव्हीसारखी महागडी वाहने स्वत:च्या नावावर करून घेतल्याची बाब उघड झाली आहे.
यासंदर्भात त्याच्याविरोधात एका फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. २९ जून २०२० ते ३ एप्रिल २०२२ या कालावधीत अशरफी, मुश्ताक अशरफी व इतर साथीदारांनी संगनमत करून कंपनीचे ग्राहक व कंपनीच्या मालकीची २६ वाहने धमकी देत हडपली. त्याने काही वाहने लपवली व उर्वरित वाहने कंपनीला कर्जाची रक्कम न देता परस्पर विकली. यामुळे फायनान्स कंपनीचे ३.५६ कोटींचे नुकसान झाले. कंपनीचे प्रतिनिधी वाहने परत मागण्यासाठी गेले असता, त्यांना अशरफीने शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेकांना गंडवले, तक्रारीसाठी समोर या
गुलाम अशरफीने अशा पद्धतीने बऱ्याच जणांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध बरेच तक्रारदार अर्ज घेऊन येत आहेत. जर कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या नावे त्याने कर्ज घेतले असल्यास दबावात न येता, अशा व्यक्तींनी समोर येऊन पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे.
जनतेला आवाहन
आरोपी गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी याच्याविरुद्ध बरेच तक्रारदार अर्ज घेऊन येत आहेत. जर कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या नावे गुलाम अशरफी याने कुठल्याही कारणाने कर्ज घेतले असल्यास कोणाच्याही दबावाला बळी न पडता नागरिकांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईकरिता पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, झाेन - ३, नागपूर महल कोतवाली यांच्याकडे संपर्क करावा.