लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुणे ते नागपूर हवाई प्रवास करणाऱ्या एका महिलेचे साडेसहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली. या हायप्रोफाईल चोरी प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनुराधा अनिरुद्ध सांबरे (वय ५०) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या धंतोलीत राहतात. शहरातील एका हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्चर म्हणून त्या सेवारत आहेत. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्या काही दिवसांपूर्वी पुण्याला गेल्या होत्या. लग्नसोहळा आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी ३.१५च्या सुमारास अनुराधा सांबरे पुण्याहून नागपूरला येण्यासाठी विमानात बसल्या. तत्पूर्वी त्यांनी आपल्या बॅगमध्ये सोन्याचे दागिने असलेले एक पाऊच ठेवले.
नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्या त्यांच्या भावाच्या कारने धंतोलीतील घरी पोहोचल्या. घरी आल्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता त्यात सोन्याचे दागिने असलेले पाऊच दिसून आले नाही. ६ लाख, ५५ हजारांचे दागिने असलेले हे पाऊच पुणे ते नागपूर हवाई प्रवासादरम्यान चोरीला गेल्याची तक्रार सांबरे यांनी सोनेगाव ठाण्यात नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक कुरसंगे यांनी या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केला. प्रकरण हायप्रोफाईल असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या चोरीचा तपास केला जात आहे.
पुणे विमानतळावरच झाली चोरी?
महागड्या सफारी बॅगमधून नेमके सोन्याचे दागिने असलेले पाऊच चोरीला गेल्याने विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पुण्याला विमानतळावर बॅग स्कॅनिंग ते विमानात लगेच ठेवण्यादरम्यान ही घटना घडली असावी, असा संशय आहे.