नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 02:22 PM2022-08-29T14:22:21+5:302022-08-29T15:01:33+5:30
गडकरी म्हणाले, दिवस कितीही वाईट आले तरी काम करण्यावर भर हवा.
नागपूर : आपली विचारधारा पक्की भाजपची आहे. विद्यार्थी नेता असताना एकदा डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याशी चर्चा सुरू होती. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे व तुम्ही चांगले व्यक्ती आहात; परंतु तुम्ही चुकीच्या राजकीय पक्षात आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये या, असे ते मला म्हणाले. त्यावर ‘मी विहिरीत जीव देईल, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेस पक्षाची विचारधाराच आवडत नाही,’ असे उत्तर त्यांना दिल्याची आठवण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.
वायपीओस साऊथ एशियाच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, आयुष्यात अनेक संघर्ष येतात व लढत राहायला हवे. मानवी संबंध ही व्यवसाय, समाजकार्य व राजकारणातील सर्वांत मोठी ताकद आहे. कधीही ‘युज ॲंड थ्रो’ असे काम करू नये. ज्याचा एकदा हात पकडला, त्याची साथ कितीही वाईट दिवस आले तरी, सोडायला नको.
आयुष्यात काम करत असताना आत्मविश्वास व सकारात्मकता असली पाहिजे, मात्र अहंकार नको. कुणीही परफेक्ट नसतो, ही बाबदेखील लक्षात घ्यायला हवी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात तरी कधी वाईट परिस्थिती येते व चढउतार होतात, मात्र आपण आपले काम करत राहायला हवे. एखाद्या वेळी पराभव झाला तर तो मनुष्य संपत नाही; मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करणे सोडतो किंवा युद्धभूमीतून माघार घेतो, तेव्हाच तो हरतो. विश्वसनीयता, प्रामाणिकपणा व लोकांचे ‘गुडविल’ हेच सर्वांत मोठे भांडवल आहे, असे गडकरी म्हणाले.