"काही लाज-लज्जा आहे की नाही"; संजय राऊतांच्या विधानावर संतापले मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:44 PM2023-08-10T15:44:51+5:302023-08-10T15:46:25+5:30
संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. देशासाठी प्रेमाचा, जादूचा फ्लाइंग किस केलाय, असं संजय राऊत यांनी म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.
नागपूर - संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सभागृहात भाषण केले. त्यावेळी मणिपूर हिंसाचारावरुन त्यांनी मोदी सरकारवर आरोप केले. दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस दिल्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रारही केली आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संजय राऊतांनी राहुल गांधींचं समर्थन केल्यावर भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांवर जोरदार टीका केली.
संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. देशासाठी प्रेमाचा, जादूचा फ्लाइंग किस केलाय, असं संजय राऊत यांनी म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, कसंय, मती भ्रष्ट झालेल्यांना असं बोलावं लागतं, यावर काय भाष्य करावं. आपल्याला धोका अशाच लोकांपासून आहे, हेच व्यक्तीमत्त्व लोकशाहीला आणि देशाला धोकादायक असतात, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला.
तसेच, उद्या तुमच्या कुटुंबातील आई-बहिणींकडे पाहून रस्त्यावर अशाप्रकारे फ्लाइंग किस केल्यावर तुमची भावना काय असेल?, तुमच्या रक्तात राग निर्माण होणार नाही?, याचं कसलं समर्थन करता?, उद्या तुमच्या आई-बहिणीकडे पाहून असं प्लाइंग किस केल्यास, देशाच्या प्रेमासाठी केलंय असं म्हटलं तर चालेल क?, काही लाज-लज्जा आहे की नाही, असे म्हणत मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला.
मोदींना निवडून येण्यासाठीचा हा प्रयत्न
राहुल गांधींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून येण्यासाठी केलेली कृती वाटते, असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवर भाष्य केलं. असं तोच नेता करू शकतो, ज्याच्या ओठामध्ये एक आहे आणि पोटामध्ये मोदीजी निवडून यावेत, असा भाव आहे. अन्यथा, या देशाच्या संसदेत अपमानजनक व्यवहार ही अपेक्षा कोणत्याही खासदाराकडून कधीच नसते, असे म्हणत राहुल गांधींच्या कृतीचा भाजपलाच फायदा होईल आणि मोदीच पुन्हा निवडून येतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
देशाचा गौरव कमी करण्याचं काम
जो नेता देशाचा पंतप्रधान व्हायचे स्वप्न पाहतो, तो कधी मनमोहनसिंगजी असताना कायद्याचे कागदं फाडतो, पुस्तकं फाडतो. लोकसभेत डोळा मारतो, अलिंगन देतो. कधी फ्लाइंग कीस देतो, एखाद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानेही अशी कृती करू नये, अशी कृती करून जगासमोर देशाचा नावलौकिक, गौरव कमी करण्याचं काम हा नेता करतो. इतर देशामध्ये अशा पद्धतीच्या कृतीला माफी नाही. आपल्या देशाची जनताही सुज्ञ आहे, आता निवडणुकीत त्यांना फ्लाइंग जागाच पाहावी लागेल, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना राहुल गांधींच्या संसदेतील कृतीवर भाष्य केलंय.