नागपूर : घरगुती सिलिंडरचे नवे दर १ एप्रिल रोजी लागू झाले. वर्षभरात २१५ रुपयांनी महाग झालेले सिलिंडर एप्रिलमध्ये केवळ दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे गरीब आणि सामान्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. वाढत्या महागाईत दर कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा फोल ठरली आहे. याशिवाय सबसिडी ४०.१० रुपयांवर थांबविल्याने ग्राहकांचा भ्रमनिरास झाला आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि घरगुती सिलिंडरमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट वाढले आहे. आवक कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. अशा महागाईत जगायचे कसे, असा प्रत्येकाचा सवाल आहे.
स्वयंपाकघराला महागाईची झळ
गॅस सिलिंडरसह स्वयंपाकघरातील सर्वच आवश्यक वस्तूंची दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोना महामारीमुळे प्रत्येकाचे मासिक उत्पन्न कमी झाले आहे. दुसरीकडे सिलिंडरची किंमत ८६१ रुपयांवर गेल्यामुळे दरमहा एवढ्या रकमेची तडजोड करावी लागत आहे. दर गरीब आणि सामान्यांच्या आटोक्यात असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
पूर्वी घरगुती गॅस सिलिंडरवर बेस व्हॅल्यूनुसार सबसिडी मिळायची. अर्थात बेस व्हॅल्यूनंतर सिलिंडरचे दर वाढल्यास ग्राहकांच्या खात्यात सबसिडीची रक्कम वाढत होती. पण, सात महिन्यांपासून केवळ ४०.१० रुपये सबसिडी मिळत असल्याने केंद्र सरकारने सबसिडी कायमच संपविण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. एप्रिलपासून ग्राहकांना सबसिडीचे १२ सिलिंडर मिळणार आहे. ४० रुपये सबसिडी ही नगण्य बाब आहे. त्यामुळे पण आता सबसिडी स्थिर केल्याने ग्राहकांना सिलिंडरच्या वाढीव वा कमी झालेल्या दरातच सिलिंडर घ्यावे लागत आहेत. केंद्राने सबसिडी वाढवावी, अशी मागणी आता पुढे आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पूर्वी चढउतार व्हायची. पण, अनेक वर्षांनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात तीनदा सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. त्या महिन्यात तब्बल ७५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या महिन्यात केव्हाही दरवाढ करू शकते, हे यावरून सिद्ध झाले आहे.
सिलिंडरच्या किमती कमी करा
गेल्या काही महिन्यांत २१५ रुपयांनी वाढविलेल्या सिलिंडरच्या किमतीत एप्रिलमध्ये केवळ १० रुपयांची घट झाली. आता महिन्याला ८६१ रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. वाढीव दरामुळे गृहिणींवर संकट आले आहे.
शीतल गावंडे, गृहिणी.
सिलिंडरची सबसिडी वाढवा
केंद्र सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत आहे. गेल्या सात महिन्यांपासून केवळ ४० रुपयेच सबसिडी मिळत आहे. पुढे बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे सामान्य संकटात येणार आहे. सरकार गरिबांची पर्वा करीत नाही, हे यावरून दिसून येते.
ललिता भांडारकर, गृहिणी.
सिलिंडरची दरवाढ नकोच
एप्रिलमध्ये सिलिंडरची किंमत १० रुपये कमी करून गरीब व सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकार केवळ करवाढ करून ग्राहकांच्या खिशातून पैसा काढत आहे. हे चुकीचे आहे. स्वयंपाकघरातील वस्तू स्वस्त असाव्यात.
संध्या फुलझेले, गृहिणी.
वर्ष २०२०-२१ मध्ये
घरगुती सिलिंडरचे दर :
ऑक्टोबर ६४६ रुपये
नोव्हेंबर ६४६ रुपये
डिसेंबर ६९६ रुपये
जानेवारी ७४६ रुपये
४ फेब्रुवारी ७७१ रुपये
१५ फेब्रुवारी ८२१ रुपये
२५ फेब्रुवारी ८४६ रुपये
मार्च ८७१ रुपये
एप्रिल ८६१ रुपये
(ऑक्टोबर २०२० पासून मिळताहेत ४०.१० रुपये सबसिडी.)