आनंद शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेतील भंगार सोन्याचे अंडे देणारी कोंबडी या म्हणीला खरे ठरवित आहे. मागील वर्षात मध्य रेल्वेने आपले भंगार विकून २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या वतीने झिरो स्क्रॅप मिशन चालविण्यात येत आहे. त्यानुसार मध्य रेल्वे झोन अंतर्गत सर्व विभाग (नागपूर, पुणे, भुसावळ, सोलापूर आणि मुंबई), वर्कशॉप आणि शेडला भंगारमुक्त करण्यात येत आहे. या मिशननुसार एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत मध्य रेल्वेने २२४.९६ कोटी रुपयांचे भंगार विकले आहे. यात भंगार झालेले रेल्वे रूळ, परमानंट वे मटेरियल, खराब झालेले कोच, वॅगन आणि रेल्वे इंजिनचा समावेश आहे. या झिरो स्क्रॅप मिशनमुळे भारतीय रेल्वेला महसूलच मिळत नसून मोठ्या प्रमाणात जागाही रिकामी होत आहे. सन २०१९-२० मध्ये मध्य रेल्वेने ५६०५७.१५ मेट्रिक टन भंगार रेल्वे रुळकोच, इंजिन विकून ३२१.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.
झोनमध्ये झिरो स्क्रॅप मिशनची अंमलबजावणी
मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या वतीने झोन अंतर्गत सर्व विभागात झिरो स्क्रॅप मिशन राबविण्यात येत आहे. त्यानुसार मागील वर्षभरात मध्य रेल्वेने भंगार विकून २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे झोन
रेल्वेच्या भंगारावर चोरट्यांची नजर
रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या भंगारावर नेहमीच चोरट्यांची वक्रदृष्टी असते. पूर्व नागपुरात असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी रेल्वेच्या भंगारावर आपला व्यवसाय थाटला आहे. साम, दाम, दंड, भेद हे धोरण अवलंबून या भंगार व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांचे रेल्वेचे भंगार पळविले आहे.
पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क खरेदी
मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटने कोरोनाच्या काळात सुरू असलेल्या मालगाड्या, पार्सल गाड्यांच्या चांगल्या देखभालीच्या दृष्टीने स्पेअर पार्ट आणि इतर महत्त्वाचे साहित्य खरेदी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विभागाने तत्परता दाखवून कमी वेळात निविदा काढून थेट प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी पीपीई किट, एन ९५ मास्क, सॅनिटायझरची खरेदी केली.
..........