डॉ. सावदेकर यांची तरुण मुलगी अपर्णा दासगुप्ता यांचे हृदयविकाराने निधन झाले व नंतर पती बाळासाहेब सावदेकर यांचेही निधन झाले. अशा एकामागून एक आपत्ती कोसळल्यामुळे मानसिकरीत्या खचल्या व त्यातून त्या सावरू शकल्या नाही. गेली काही वर्षे त्यांची स्मृतिभ्रंशातच गेली आहेत. तेव्हापासून त्या सोनेगाव एचबी इस्टेट परिसरातील विहीनीसोबत राहात होत्या. त्यांचे स्नेही डाॅ. निखिल हे त्यांची वैद्यकीय देखभाल करीत हाेते.
विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या मुखपत्राच्या प्रमुख संपादक राहिलेल्या डाॅ. सावदेकर यांनी वि.सा.संघाकरीता ‘कविता विदर्भाची’ हे कविताविषयक महत्त्वाचे संपादन केले. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास हा त्यांचा प्रबंध, कथाकार पु.भा. भावे यांच्यावरील ‘पु.भा.भावे : साहित्यवेध’, कादंबरीकार ना.सी. फडके यांच्या अध्ययनावरील ‘भारतीय साहित्याचे शिल्पकार: ना.सी. फडके’, ‘मुशाफिरी’ ही महत्त्वाची पुस्तके आहेत. त्यांचा काव्याचा व्यासंग आणि अभ्यास मोठा हाेता. ‘मुशाफिरी’ या नावाने मराठी कवितेची समीक्षा करणारा ग्रंथ तसेच बा.भ. बोरकर यांच्या कवितेची पृथगात्मता, समीक्षेची समीक्षा आणि काव्यगंगेच्या तटावर हे ग्रंथ प्रकाशित आहेत. जयकृष्ण केशव उपाध्ये या विदर्भातील या मान्यवर कवींचा काव्यसंग्रह आशाताईंनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केला आहेे. 'मी तुळस तुझ्या अंगणी' ही एक त्यांची एक कादंबरीही आहे. लोकमत साहित्य जत्रेचे संपादन आणि लेखनाचे कार्य त्यांनी केले आहे. वैदर्भीय प्रतिभेच्या डॉ. कुसुमावती देशपांडेंच्या परंपरेत त्यांच्यानंतर डॉ. आशा सावदेकर यांनी त्यांच्या व्यासंगाने स्थान निर्माण केले होते. ‘सरस्वती सन्मान’ प्रदान करणाऱ्या अंतिम निवड समितीतही त्या राहिल्या होत्या. त्यांच्या निधनाने शाेकभावना व्यक्त केली जात आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या मुखपत्राच्या प्रमुख संपादक राहिलेल्या, कवितेच्या साक्षेपी अभ्यासक, समीक्षक, ललित लेखक आणि माझ्या एक आत्मीय, सुहृद स्नेही डॉ. आशा सावदेकर यांचे निधन साहित्य जगतासाठी वाईट बातमी आहे. त्यांच्यासोबतच मीही तेव्हा युगवाणीचा संपादक म्हणून काम केले आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या जुन्या आत्मीय स्नेह्यांपैकी मीही एक आहे. अनेक पुस्तकांचे लेखन, संपादन व कवितांचे समीक्षण त्यांनी केले आहे. त्यांच्या निधनाने विदर्भ, महाराष्ट्र एका महत्त्वाच्या समीक्षकाला मुकला आहे.
- श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि विदर्भ सांस्कृतिक परिषद