लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाच दिवसाच्या वादळी चर्चेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना, तसेच दिलेल्या निर्देशावर ६ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात उत्तरे व स्पष्टीकरण देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले होते. परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून लेखी उत्तरे मिळाली नाहीत. निगम सचिवांनी लेखी उत्तर देण्यासाठी मंगळवारपर्यंत वेळ वाढवून मागितली आहे.सर्वसाधारण सभेत २६ जून रोजी संदीप जोशी यांनी स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु अद्याप मंजुरी मिळालेली कामे सुरू झालेली नाही. कोविड-१९ नियंत्रणासाठी उपाययोजना करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. नियोजन नसल्याने कोरोना संसर्ग वाढला, असा आरोप नगरसेवकांनी केला होता. यावर ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. अनियमितताप्रकरणी डॉ. प्रवीण गंटावार व डॉ. शीलू गंटावार यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले होते. यावर प्रशासनाने अद्याप कारवाई केली नाही.नागरिकांना वेठीस धरणारा उपद्रव शोध पथकातील कर्मचारी संदीप उपाध्याय याला तात्काळ कामावरून कमी करा, पथदिव्यांची फाईल रोखणाºया तत्कालीन वित्त अधिकारी मोना ठाकूर यांच्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस करावी. स्थायी समितीची परवानगी न घेता रजेवर जाणारे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी ६ जुलैपर्यंत स्पष्टीकरण द्यावे. तसेच स्थायी समितीची मंजुरी न घेता प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या, यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते.मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून लेखी उत्तरे मिळाली नव्हती. यासाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत वेळ वाढवून द्यावी, अशी विनंती निगम सचिव रंजना लाडे यांनी केली आहे. त्यानुसार एक दिवसाचा कालावधी वाढवून दिला असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सभामहानगरपालिका, नगरपालिका यांच्या सर्वसाधारण सभा व त्यांच्या विविध विषय समित्यांच्या सभा घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ३ जुलैला परिपत्रक जारी केले आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या वेळेस सभा बैठका घेणे बंधनकारक केले आहे. या अनुषंगाने पुढील आदेशापर्यंत सभा बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहे. याबाबतचे परिपत्रक निगम सचिव रंजना लाडे यांनी काढले आहे.
महापौरांच्या आदेशानुसार आयुक्तांकडून मंगळवारी मिळणार लेखी उत्तरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 10:09 PM