४२ जणांचे वर्ष वाया जाणार : हरिभाऊ आदमने महाविद्यालयाचा प्रताप नागपूर : सावनेर येथील हरिभाऊ आदमने महाविद्यालय हे वादांचे केंद्रच झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये या महाविद्यालयातील गोंधळ समोर आला आहे. महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे ‘बीकॉम’ अंतिम वर्षाचे ४२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची पुन:परीक्षा घेण्यास नकार दिला असून विद्यार्थी व पालकांमध्ये महाविद्यालयाबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या चुकीला जबाबदार असणाऱ्या प्राचार्यांवर काय कारवाई होणार, असा संतप्त सवाल त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ किंवा ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट’ हे वैकल्पिक विषय असतात. तर ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ हा नियमित विषय असतो. हरिभाऊ आदमने महाविद्यालयाच्या २०१६-१७ च्या माहितीपुस्तिकेत ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ हा विषय नियमित दाखविण्यात आला होता तर ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ या विषयाला ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट’ हा विषय वैकल्पिक दाखविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी माहितीपुस्तिकेनुसारच विषयांची निवड केली तसेच परीक्षा अर्जातदेखील तसेच नमूद केले. ‘फंक्शनल मॅनेजमेंट’ हा विषय नियमित समजून तेथील प्राध्यापकांनी ७६ विद्यार्थ्यांच्या वर्षभर तासिकादेखील घेतल्या. वैकल्पिक म्हणून ३४ विद्यार्थ्यांना ‘कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग’ तर ४२ विद्यार्थ्यांना ‘एन्ट्रप्रेनरशिप डेव्हलपमेन्ट’ हा विषय शिकविण्यात आला. अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षादेखील यानुसारच झाल्या. पुन:परीक्षा शक्य नाही यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता नव्या विद्यापीठ कायद्यात पुन:परीक्षेची तरतूदच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कमीत कमी वेळापत्रक तरी तपासायला हवे होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. नियमात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही दिलासादेखील देऊ शकत नाही. मात्र संबंधित प्रकरण शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुणावर कारवाई होणार ? संबंधित प्रकरणात महाविद्यालयाची चूक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र विद्यार्थ्यांनीदेखील वेळापत्रक पाहण्याची तसदी घेतली नाही. महाविद्यालयाच चुकीच्या पद्धतीने विषय कसे काय शिकविण्यात आले व प्राचार्यांचे याकडे लक्ष नव्हते का, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
चूक कॉलेजची, भुर्दंड विद्यार्थ्यांना
By admin | Published: May 03, 2017 2:17 AM