काल पत्र लिहिलं पण आज...; नवाब मलिकांच्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर टाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:29 PM2023-12-08T12:29:30+5:302023-12-08T12:31:47+5:30
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीसांच्या पत्रावर उत्तर देणं टाळलं होतं.
नागपूर - राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या एंट्रीने. मलिक यांनी सत्ताधारी बाकावर बसल्याने मुख्यमंत्री व गृहमंत्री अडचणीत आले होते. त्यावर, गृहमंत्र्यांनी सभागृहात विरोधकांना उत्तरही दिले. मात्र, रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत असणे योग्य नसल्याचंही स्पष्ट केले. मात्र, याच प्रश्नावर आज फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न केला. मात्र, या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीसांच्या पत्रावर उत्तर देणं टाळलं होतं.
सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे. विरोधी पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे. देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली. मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही (आज) नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रश्नावर आज फडणवीसांनी उत्तर टाळलं.
एअरबस उद्घटन कार्यक्रमाच्या ठिकाणी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, इंदामर-एअरबस हेलिकॉप्टर एमआरओच्या उद्घाटनाबद्दल माहिती दिली. तसेच, आज एअरबसचा विषय आहे, असे म्हणत कालच्या पत्रावर आणि नवाब मलिक यांच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.
नवाब मलिकांच्या प्रश्नावर चिडले अजित पवार
देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे. मात्र, त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे," असं अजित पवारांनी म्हटलं. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर बोलताना अजित पवार काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.