नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एक्स-रे फिल्मचा पुन्हा तुटवडा पडला आहे. फिल्म पुरवठा करणाऱ्या कंपनीचे ४५ लाखांचे बिल थकल्याने त्यांनी पुरवठा करण्यास नकार दिला आहे. गेल्या दहा दिवसांपासून केवळ गंभीर रुग्णांचेच एक्स-रे होत आहे. यामुळे सामान्य रुग्णांच्या पदरी निराशा पडत असून आजाराचे निदान होत नसल्याने उपचार लांबत आहे. विशेष म्हणजे, गेल्या हिवाळी अधिवेशनाच्यादरम्यान हीच स्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी अधिष्ठात्यांनी आपल्या स्थानिक फंडातून यासाठी निधी दिला होता. शासकीय रुग्णालयात क्ष-किरण विभाग महत्त्वाचा मानला जातो. या विभागात एक्स-रे, एमआरआय आणि सिटी स्कॅनसाठी दिवसभरात ५००-६०० एक्स-रे फिल्म लागतात. महिन्याचा हा खर्च चार-पाच लाखांच्या घरात आहे. एक्स-रे फिल्म पुरवठादार कंपनीचे ४५ लाख रुपये थकल्याने त्यांनी जुलै महिन्यापासून एक्स-रे फिल्म देणेच बंद केले आहे. परिणामी सामान्य रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात होता. मेडिकल प्रशासन फक्त गंभीर रुग्णांच्याच एक्स-रे फिल्मचा खर्चाचा भार उचलत आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातही कंपनीचे ६५ लाख थकल्याने तुटवडा निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले व आमदार सुधाकर कोहळे यांनी थकीत बिलांना मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न चालविल्याने यश आले होते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मेडिकल प्रशासनाला या संदर्भात विचारले असता वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगत आहे. मात्र, फिल्म कधी येणार याबाबत बोलायला तयार नाही. रुग्णांनी आणखी किती दिवस तिष्ठत राहायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
‘एक्स-रे’ फिल्मचा तिढा सुटेना
By admin | Published: July 18, 2015 2:51 AM