ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - नागपूर सेंट्रल जेलमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि त्याचे कारण आहे फाशीची शिक्षा झालेल्या दोषींनी एकमेकांना केलेली गंभीर मारहाण... पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणातील दोषी हिमायत बेगने युग चांडक हत्याप्रकरणातील दोषी राजेश द्वारेला मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली. या मारहाणीत जितेंद्रसिंग तोमर या गुन्हेगाराचाही समावेश आहे.
हिमायत बेग तसेच राजेश द्वारे या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांना नागपूर सेंट्रल जेलमधील फाशी यार्डात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासह तेथे आणखी काही गुन्हेगार असून काल रात्री जेवणादरम्याव हिमायत व राजेश यांच्यात काही कारणावरून वादावादी झाली व त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. चिडलेल्या हिमायतने भाजी वाढण्याच्या पळीने राजेशच्या डोक्यावर जोरदार वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. फाशी यार्डात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही हाणामारीची ही घटना घडल्याने तुरूंग प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गेल्यावर्षीही नागपूर तुरूंगातून ५ कुख्यात कैदी पळाले होते, त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती, मात्र काल पुन्हा हा गुन्हा घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.