मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी याकूबला संचित रजा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 08:15 PM2021-12-22T20:15:13+5:302021-12-22T20:16:10+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी १९९७ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी मोहम्मद याकूब अब्दुल माजीद नागुल याला १४ दिवसांची संचित रजा मंजूर केली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी १९९७ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी मोहम्मद याकूब अब्दुल माजीद नागुल याला १४ दिवसांची संचित रजा मंजूर केली. न्यायमूर्तीद्वय महेश सोनक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
नागुलला विविध कलमांतर्गत एकूण ५५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रत्येक कलमांतर्गतचा कारावास त्याला एकापाठोपाठ एक भोगायचा आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह प्रशासनाकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका मंजूर केली. यापूर्वी रजा दिली असता नागुलने नियम व अटींचे पालन केले. त्यामुळे त्याला यावेळीही रजा नाकारण्याचे काहीच कारण नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. नागुलतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.