लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुरस्कार स्वीकारणे, नाकारणे किंवा साभार परत करणे, या परंपरा आता नव्या राहिल्या नाहीत. ज्येष्ठ आंबेडकरवादी चिंतक यशवंत मनोहर यांनी त्याच परंपरेला नव्याने चालना देत, विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार नाकारला. मात्र, स्वीकारण्याचे दिलेले आश्वासन, त्या योगे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार सोहळे स्वीकारल्यानंतर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अवघ्या दोन तास आधी त्यांनी कळविलेला नकार अनेकांना संभ्रमित करणारा ठरला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा नकार कळविताना आपल्या भाषणाच्या सॉफ्टकॉपीही सर्वत्र प्रसारित केल्या आहेत. त्यांच्या या धोरणाने त्यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या ९८व्या वर्धापन दिनी १४ जानेवारीला इतर पुरस्कारांसोबतच अत्यंत महत्त्वाचा असा जीवनव्रती पुरस्कार यशवंत मनोहर यांना त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी देण्यात येणार होता. हा पुरस्कार स्वीकारण्याची लेखी हमीही त्यांनी वि.सा. संघाला दिली होती. मात्र, ऐन वेळी त्यांनी वि.सा. संघाचे डॉ. इंद्रजीत ओरके यांच्या नावासकट एक व्हॉट्सॲप कॉपी सर्वत्र प्रसारित करत ‘सरस्वतीची प्रतिमा व्यासपीठावर असल्या कारणाने हा पुरस्कार नाकारत आहे’ असे जाहीर केले. या अशा अचानक केलेल्या घोषणेने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे, या व्हॉट्सॲप कॉपी घोषणेसोबतच यशवंत मनोहकरांनी पुरस्कार सोहळ्यादरम्यान द्यावयाच्या स्वत:च्या भाषणाची कॉपीही प्रसारित केली होती. इतकी सगळी तयारी केली असताना, ऐन वेळी घेतलेला हा निर्णय अनेकांना बुचकळ्यात पाडणारा ठरला. त्या संदर्भात आता संपूर्ण साहित्य क्षेत्र ढवळून निघत आहे.
समन्वय साधणे गरजेचे होते - प्रेमानंद गज्वी
यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार आधी स्वीकारला आणि नंतर नाकारला, यात समन्वयाची उणिव दिसून येते. यशवंतर मनोहर हे आंबेडकरी विचारांचे असल्याने ते ब्रह्मा-विष्णू-महेश मानणार नाही, हे ओघानेच आले, परंतु सार्वजनिक जीवनाचे काय. सरस्वती ही काही मानवी नाही, हे मानले, तरी सरस्वती पूजन ही फार प्राचीन परंपरा आहे. त्यामुळे आपण विज्ञानाची कास कधी धरणार, हा एक प्रश्न उपस्थित होता. दोन्ही बाजू वादाच्याच आहेत. दुसऱ्या मताचा सन्मान ठेऊन तुम्हाला तुमची मते मांडता आली असती, अशी भावना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
प्रतिमांचा विरोध हा तात्त्विक कसा असू शकतो - मदन कुळकर्णी
स्वीकारावे, पत्रिकेत नाव छापून आणावे आणि नंतर प्रतिमेचा विरोध म्हणून पुरस्कार नाकारावे, हे साहित्यात बरे नाही. प्रतिमांचा विरोध हा तात्त्विक असा असू शकतो. दुसऱ्यांच्या विचारांचा, भावनांचा सन्मान करणे हे प्रत्येक साहित्यिकाचे कर्तव्य आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी डॉ.आरती कुळकर्णी यांच्या दलित आत्मकथने : साहित्य स्वरूप या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते उद्घाटक म्हणून आले होते. वि.सा. संघाच्याच इमारतीत असलेल्या गडकरी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ते होते. मग आत्ताच असली भूमिका व्यक्त करणे म्हणजे भ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याची भावना ज्येष्ठ समीक्षक डॉ.मदन कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाने श्रेष्ठ मार्गदर्शनाला मुकलो - वि.स. जोग
जीवनव्रती पुरस्कारास लेखी संमती देतानाच, ती सशर्त स्वीकारणार असे स्पष्ट सांगणे अपेक्षित होते. कार्यक्रमाची आखणी-मांडणी झाल्यावर प्रतिमेचे कारण काढणे योग्य नाही. सरस्वती ही सारस्वतांची प्रतीक आहे, वादाचे नाही. पश्चिम बंगालमध्ये अतिशय कडवे कम्युनिस्टही दुर्गेच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मनोहरांच्या या भूमिकेमुळे मात्र एका चांगल्या साहित्यिकाच्या मार्गदर्शनाला विशेषत्त्वाने मी मुकलो आहे. कारण यापूर्वी मलाही हाच पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वि.स. जोग यांनी म्हटले.
यात कुठली प्रगल्भता - रवींद्र शोभणे
हा पुरस्कार आपण स्वीकारत आहोत, असे आधी त्यांनी आयोजकांना कळविले होते. निमंत्रण द्यायला गेलेल्या सदस्यापुढेही अशी सरस्वतीची कुठलीही अट त्यांनी टाकली नव्हती किंवा थेटपणे त्यांनी तसे पत्र देऊन नकाराचे कारणही कळवले नाही. कार्यक्रमाच्या दोन तास आधी त्यांचा तसा फक्त व्हॉट्सॲप वर मेसेज आला. यात कुणाला त्यांची प्रगल्भता दिसत असेल, तर त्यांनी ती मान्य करावी. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या साहित्याचे मोठेपण मान्य केल्यामुळेच त्यांना जीवनव्रती पुरस्कार जाहीर केला. ऐन वेळी त्यांची भूमिका वेदनादायी ठरली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली.
तत्त्वांच्या भूमिकेला आमचा सलाम - अरुणा सबाने
साहित्य संस्थेचा आणि धर्माचा काहीही संबंध असू नये, असे मला स्वतःला वाटते. धर्म वेगळा, साहित्य वेगळे. भारतीय संस्कृतीत, विशेषतः हिंदू संस्कृतीत सरस्वतीला मोठे स्थान दिले गेले आहे, पण आमची श्रद्धा सावित्रीबाई फुले, जिजामाता, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, रखमाबाई या आहेत. करायचाच असेल, तर आम्ही यांचा गौरव करू, करतोच. वि. सा. संघाने कुणाचा गौरव करायचा, कुणाची प्रतिमा ठेवायची, हा त्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. मनोहर सरांनी सरस्वतीची प्रतिमा तिथे असणार होती, म्हणून तो पुरस्कार नाकारला. हा सरांच्या तत्त्वांचा प्रश्न आहे. आपण कायम आपल्या भूमिकेशी प्रामाणिक असलेच पाहिजे, तरच आमच्या पुरोगामित्वाला काही अर्थ आहे. सरांची भूमिका योग्य असल्याची भावना ज्येष्ठ साहित्यिक अरुणा सबाने यांनी व्यक्त केली.
.............