लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची राजकीय पायाभरणी केली, सहकार वाढविला व ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध केला. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री व अर्थमंत्री पदेही यशस्वीपणे सांभाळली. ज्यांचा साहित्य, कला, संस्कृतीशी सबंध येईल, अशी माणसे राजकारणात शोधून सापडणार नाहीत. परंतु यशवंतरावांनी राजकारणासोबत महाराष्ट्राचीही साहित्यिक, सांस्कृतिक वारसा समृद्ध केला. त्यांनी धर्मनिरपेक्ष सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दिशेने कायम वाटचाल केली, असे मनोगत लोकमतचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने आयोजित यशवंत महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गिरीश गांधी, आमदार हेमंत टकले, प्रा. गणेश चव्हाण, प्रदीप विटाळकर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. द्वादशीवार यांनी यशवंतरावांच्या जीवनचरित्राचे पैलू उलगडले. ते गरिबीत जन्माला आले आणि गरिबीतच मरण पावले. निधन झाले तेव्हा त्यांच्या पासबुकमध्ये ३६ हजार रुपये होते. कुठे फ्लॅट नाही व शेती समृद्ध करणाऱ्या या माणसाकडे एकरभर शेतीही नव्हती. ब्राह्मणेत्तर चळवळीत जन्मले तरी विरोधकांविषयी द्वेषभावनेऐवजी प्रत्येकाच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करण्याची विवेकबुद्धी त्यांच्यात होती. आधी गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या यशवंतरावांनी संधी मिळाली तेव्हा विविध भाषांसह राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लष्करशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. दोनच वर्षे मिळालेली राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची गरज दिल्लीतही पडली. १९६२ च्या भारत-चीन युद्धात पराभवानंतर त्यांना देशाचे संरक्षणमंत्रिपद देण्यात आले. पुढे १९७१ मध्ये पाकिस्ताचा पराभव करून त्याचे दोन तुकडे करण्याचे श्रेय यशवंतरावांच्या नेतृत्व कौशल्यालाच जाते. पुढे गरज पडली तेव्हा गृहमंत्रिपद, परराष्ट्रमंत्रिपद व अर्थमंत्रिपदाची धुराही त्यांनी अतिशय यशस्वीपणे सांभाळली. मात्र एवढे उत्तुंग कर्तृत्व लाभलेल्या या माणसाला अखेरच्या काळात एकाकीपण आले. राजकारणात कितीही यश मिळविले तरी एक चूक क्षम्य नसते. यशवंतराव चव्हाण यांनी कॉग्रेसफुटीनंतर संघटन कॉग्रेसची बाजू घेतली. त्यामुळे ते दिल्लीत नावडते झाले. पुढे देशात लागलेल्या आणीबाणीचे समर्थने केल्याने ते देशाचेही नावडते झाले. ज्ञान, अध्ययन, भाषाप्रभुत्व, लेखनशैली आणि राजकीय कर्तृत्वाचा संगम असलेल्या यशवंतरावांच्या वाट्याला अखेरच्या काळात एकाकीपण आले.इंदिरा गांधी यांच्या पराभवानंतर अध्यक्षपद मिळालेल्या यशवंतराव चव्हाण यांचे अतिशय निष्ठावान शरद पवार यांनी काँग्रेस सोडली. त्यांच्या शेवटच्या क्षणी राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त राज्याचा एकही नेता भेटायला गेला नाही, हा महाराष्ट्राचा कृतघ्नपणा असल्याची टीका द्वादशीवार यांनी केली. राजकारणात राहून माणुसकीच्या सर्व खुणा जपणारा दुसरा होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. अतिशय गरिबीतून आलेल्या यशवंतरावांनी कठीण परिश्रमाने कर्तृत्व गाठले. त्यांनी राज्यात आणि केंद्र शासनातही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या अतिशय यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांनी राजकारण आणि संस्कृती असे दोन्ही क्षेत्र सरमिसळ न करता समृद्ध केले. या मोठ्या व्यक्तिमधील विद्यार्थी सतत जागा होता. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी इंग्रजी, हिंदी भाषांचा अभ्यास केला. व्यक्ती गेली की कार्य संपत असते. मात्र यशवंत चव्हाण प्रतिष्ठान हे यशवंतरावांचे जिवंत स्मारक असल्याचेही मत त्यांनी यावेळी नोंदविले. यावेळी हेमंत टकले यांनीही विचार व्यक्त केले. शशिकांत काशीकर यांनी आभार मानले.