तीव्रता दडपण्याचा प्रयत्न : ऐवज कमी दाखविण्यावरच अधिक भर
यवतमाळ : यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात चोरी व घरफोडीच्या घटना घडत आहे. मात्र त्यातील रक्कम कमी दाखवून तीव्रता दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून नेहमीच होताना दिसतो. त्याचा अनुभव घरफोडीचे शिकार झालेल्या अनेक नागरिकांना आला आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत नोंदविलेला चोरी गेलेल्या मालाचा आकडा प्रत्यक्ष गुन्हा दाखल करताना अर्ध्यावरच आल्याचेही अनेकांनी सांगितले. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून सर्वप्रथम त्याची तीव्रता दडपण्याचा प्रयत्न होतो. फिर्यादीकडून सांगण्यात येणारा चोरीतील रकमेचा आकडा कमीत कमी दाखविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. अनेकदा तर चोरीच्या फिर्यादीवर, त्यातील रकमेवर पोलिसांकडून संशय व्यक्त करून गुन्ह्यालाच बगल देण्याचा प्रयत्न होतो. गेल्या तीन महिन्यात यवतमाळ शहर आणि वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डझनावर घरफोडीचे गुन्हे नोंदविले गेले. लग्न घरासह, लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्यांची घरे चोरट्यांनी फोडली. मात्र यातील एकाही चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश येऊ शकलेले नाही. चोरट्यांची एकही टोळी पोलिसांच्या हाती लागली नाही.
दरदिवशी चोर्या होत असताना आणि डिटेक्शन शून्य असताना स्थानिक गुन्हे शाखा, डीबी स्कॉड, पोलिसांची विशेष पथके यांची कामगिरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाखांच्या प्रमुखांना जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षकांनी चालू वर्षातील त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास तो झिरोच येईल, एवढे निश्चित. दरदिवशी घडणार्या चोरीच्या घटना पाहता यवतमाळच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे घरफोड्याच होत नाही तर बँकेतून रोकड घेऊन निघणार्या खातेदारांची वाटमारी, बसस्थानकावर प्रवाशाची बॅग लंपास करणे, पाकीटमार, महिलांकडून गळ्यातील दागिने लंपास करणे हे गुन्हेही वाढले आहेत. यवतमाळ शहरच नव्हे तर चोरी, घरफोडी व वाटमारीच्या गुन्ह्यांचे लोण पाटणबोरी सारख्या राज्य सीमावर्ती गावापर्यंत पोहोचले आहे. चोरटे व लुटारूंनी उच्छाद मांडलेला असताना पोलीस यंत्रणा ढिम्म असल्याने त्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्न चिन्ह लावले जात आहे. (प्रतिनिधी)
हा तर चोर्यांचा सिझनच : पोलिसांचा बचाव
चोर्या-घरफोड्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात अद्यापही यश न आलेल्या यवतमाळ शहरातील डिटेक्शन शाखांनी आता ‘उन्हाळा हा चोर्यांचा सिझनच आहे’ असे सांगून स्वत:चा बचाव चालविला आहे. उन्हाळ्यात लोक सुट्या आणि विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी जातात. हीच संधी साधून चोरटे सक्रिय होतात. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वत्रच चोरी-घरफोडीच्या घटना वाढत असल्याचा युक्तीवाद पोलिसांमधून करण्यात येत आहे. सोबतच नागरिकांनीही पोलिसांवर पूर्णत: अवलंबून न राहता स्वत:च स्वत:च्या मालमत्तेची सुरक्षा करावी, त्यासाठी सतर्क रहावे, खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यास पोलीस विसरत नाहीत.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असूनही एकही गुन्हा उघडकीस येऊ शकला नाही, हे अपयश असल्याचेसुद्धा डिटेक्शन मास्टर मान्य करीत आहे. मात्र लवकरच घरफोड्यांची टोळी गजाआड होईल, असा विश्वास व्यक्त करताना त्यासाठी सापळा लावला असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.