नागपूर : विदर्भासह ठिकठिकाणच्या गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला यवतमाळचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण दिवटे याच्या शुक्रवारी गुन्हेशाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. यवतमाळचा डॉन मानला जाणाऱ्या दिवटेविरुद्ध हत्येचे तीन तर हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे आहेत. याशिवाय गेल्या वर्षी यवतमाळात गाजलेल्या गुंठा राऊत अपहरण प्रकरणातही त्याचा हात असल्याचा आरोप असून, या गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात तो पोलिसांना वॉन्टेड होता. दिवटेची पत्नी यवतमाळ पालिकेची नगरसेविका असून, काही नेत्यांशी त्याची सलगी असल्यामुळे राजकारणातही त्याचा दबदबा आहे. त्याचा गैरफायदा घेऊन तो आपल्या अवैध धंद्यांवर पांघरुण घालतो. यवतमाळमधील बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांसोबत दिवटेचे पटत नाही. त्याने अनेक प्रतिस्पर्धी गुंडांची वाट लावल्यामुळे त्याच्यावर अनेक गुंड सूड उगवण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर, दिवटेवर गेल्या वर्षी प्राणघातक हल्ला झाला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला नागपुरातील खामल्याजवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रदीर्घ उपचारानंतर दिवटे बरा झाला.येथील इस्पितळात असताना त्याने नागपुरातील अनेक गुन्हेगारांशी संबंध प्रस्थापित केले. येथून जाताना त्याने एक नवी कोरी कारही सोबत नेली. त्यानंतर काही दिवसांनी दिवटे आणि त्याच्या गुंडांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला. दिवटेविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या गुंठा राऊत नामक गुंडही रहस्यमय पध्दतीने बेपत्ता झाला. त्याचे अपहरण दिवटेच्या टोळीनेच केले, अशी जोरदार चर्चा होती. राऊतचे काय झाले ते यवतमाळकरांना नंतर कळलेच नाही. दरम्यान, दिवटे या गुन्ह्यासह अनेक गुन्ह्यात पोलिसांना वॉन्टेड होता. वर्षभरापूर्वी डीसीपी रंजन शर्मा यवतमाळला एसपी होते. त्यांना दिवटेबद्दल माहिती होती. गेल्या काही दिवसांपासून दिवटे नागपुरातील सोनेगाव-राणाप्रतापनगर भागात राहात असल्याची माहिती मिळाल्यामुळे गुन्हेशाखेच्या पथकाने त्याला शुक्रवारी दुपारी जेरबंद केले. वृत्त लिहिस्तोवर त्याची चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी)
यवतमाळचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण दिवटे जेरबंद
By admin | Published: August 29, 2015 3:12 AM