लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित केले अन् ऐन संमेलन उंबरठ्यावर असताना त्यांना संमेलनात येऊ नका, असे पत्र पाठविले. हा प्रकार करून आयोजन समिती महामंडळावर व महामंडळ आयोजन समितीकडे बोट दाखवित आहे. पण या सर्व प्रकाराकडे साहित्यिक, लेखक व कवींकडून आयोजक समितीवर व महामंडळावर ताशेरे ओढले जात आहेत.नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर ते मागे घेणे, हा प्रकार आयोजकांच्या दृष्टीने अतिशय लज्जास्पद आहे. अशा पद्धतीने एखाद्या लेखकाचा, विचारवंताचा अपमान करणे चुकीचे आहे. नयनतारा सहगल व तत्सम पाहुण्यांच्या संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षांनी कुठली भूमिका घ्यायची हे अजूनही गुलदस्त्यात आहे. अध्यक्ष म्हणतात हे आयोजकांनी ठरविले आहे. परंतु संमेलनात सहभागी होणाऱ्यापासून पाहुण्यांपर्यंतचे सर्व नियोजन आयोजन समिती व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ठरत असते. त्यामुळे महामंडळाच्या अध्यक्षांना माहिती नसणे, असे सांगणे हा दुटप्पीपणा आहे. एखाद्या लेखकाचा अशा पद्धतीने अपमान होत असेल तर त्यासंदर्भात महामंडळाच्या अध्यक्षांनी पुढे येऊन भूमिका मांडावी. या प्रकारातून महामंडळाचे वस्त्रहरण होत आहे ते थांबवावे. अशा वाईट आणि लांच्छनास्पद गोष्टींना आजचा मराठी वाचक आणि रसिक कधीही माफ करणार नाही. यवतमाळात होणाºया संमेलनाला लागलेले हे गालबोट साहित्य संमेलनाच्या इतिहासातील काळी नोंद म्हणून नोंदली जाईल. या सर्व प्रकाराला आयोजक संस्थेपेक्षा महामंडळ अधिक जबाबदार आहे.- डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिकनयनतारा सहगल या प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटक म्हणून येत होत्या. पण त्यांना निमंत्रण देऊन, त्यांचे निमंत्रण परत घेण्यात आले. त्यांच्या लिखित भाषणावरून त्यांचे निमंत्रण परत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हा समस्त साहित्यिकांचा अपमान आहे. हा प्रकार म्हणजे जेवायला आमंत्रण देणे आणि भरलेल्या ताटावरून उठविण्यासारखा आहे. खरे म्हणजे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. या प्रकाराबद्दल संमेलनाच्या अध्यक्षांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. सर्व साहित्यिकांनी एकत्र येऊन निश्चित भूमिका घेतली पाहिजे. एका जगप्रसिद्ध लेखिकेचा हा पराकोटीचा अपमान झाला आहे. हा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबल्यासारखा आहे. म्हणून समस्त साहित्यिकांनी निश्चित भूमिका घेऊन अभिव्यक्तीवर होणाºया या भ्याड हल्लाचा सोक्षमोक्ष लावायची वेळ आली आहे. सर्वांनी या संमेलनावर बहिष्कार टाकला पाहिजे.- महाकवी सुधाकर गायधनी, ज्येष्ठ साहित्यिक
एखाद्याला सादर आमंत्रित करायचे आणि नंतर त्यांना नाही म्हणायचे, हा प्रकार सामान्य माणूसही अपमानित होईल असा आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हा प्रकार ज्येष्ठ श्रेष्ठ ९२ वर्षांच्या लेखिका नयनतारा सहगल यांच्यासोबत केला आहे. हा त्या लेखिकेचा महाभयंकर अपमान आहे. आयोजकांनी त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची सर्व माहिती घ्यायला हवी होती. त्यांची विचारसरणी, त्यांचे लेखन न पटण्यासारखे असते तर त्यांना आमंत्रितच करायला नको होते. संमेलन तोंडावर आले असताना हा प्रकार न्यायोचित नाही.- शुभांगी भडभडे, ज्येष्ठ लेखिकानयनतारा सहगल यांना उद्घाटनाला बोलाविले आणि अगदी साहित्य संमेलन उंबरठ्यावर असताना त्यांना नाही म्हणणे हा प्रकार म्हणजे अतिशय मोठा अपमान आहे. ही क्रूर वागणूक आहे. सहगल या काही सामान्य लेखिका नाही. अत्यंत स्वाभिमानी आणि टोकदार लेखन करणाºया लेखिका आहेत. अशा व्यक्तीला उद्घाटक म्हणून आमंत्रित करून त्यांना नकार देण्याचा अधिकार महामंडळ आणि आयोजिक समितीला कुणी दिला, हा माझा प्रश्न आहे. एखाद्या ज्येष्ठश्रेष्ठ लेखिकेचा अशाप्रकारच्या अपमानाचा मी तीव्र निषेध करते.- अरुणा सबाने, लेखिकानयनतारा सहगल यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखिकेचे निमंत्रण रद्द करण्याचा विचार आयोजक कसे करू शकतात. त्यांची भाषा महत्त्वाची नाही, त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. जे एकही लेखक करू शकला नाही, ते त्यांनी करून दाखविले आहे. मग धमकीला भिऊन त्यांचे निमंत्रण रद्द करण्याचा भ्याड निर्णय आयोजकांनी का घेतला. राज ठाकरे यांनी विरोधात नसल्याचे सांगितले व सरकारनेही आमचा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले. सहगल यांचे भाषण अतिशय परखड आणि महत्त्वाचे आहे. मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास असणाºया लेखकांच्या पाठीशी आहे. त्यांचे भाषण होणार नसेल तर हे संमेलनाच रद्द करून ते पैसे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला द्यावे.- किशोर सानप , संत साहित्यिक
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांची उपस्थिती धोकादायक वाटल्याने त्यांचे निमंत्रण रद्द करण्याची संमेलन आयोजकांची कृती निषेधापलीकडची आहे. याला जबाबदार कोण हे जाणून घेण्यात आम्हाला रस नाही. काही संघटना आणि पक्ष कार्यकर्ते यांचा शिखंडी करून कोणी नेमका बाण मारला आहे हे सर्वांना ठाऊक आहे. आम्हा मराठी लेखकांना ही कृती अत्यंत निंदनीय वाटते. आम्ही अशी मागणी करतो की,नयनतारा सहगल यांचे भाषण संमेलनाच्या उद्घाटकीय मंचावरून वाचले जावे. नयनतारा सहगल न येण्याने आयोजकांची अडचण दूर झाली आहे. पण त्यांचं भाषण ही काही त्यांची अडचण दिसत नाही. त्यामुळे सहगल यांचे विचार जाणून घेण्याचा प्रतिनिधी शुल्क भरून संमेलनाला आलेल्या रसिकांना पूर्ण हक्क आहे. किमान त्या हक्काची तरी बूज राखली जायला हवी.- कवी हेमंत दिवटे
जे झाले ते चुकीचे झाले. व्यक्ती कुणीही असली तरी, कुणासाठीही निमंत्रण रद्द करणे अपमानास्पदच आहे. चूक नयनतारा यांचीसुद्धा आहे. त्यांनी आपले भाषण मीडियाला पुरवायला नको होते. जे त्यांचे भाषण आहे ते पूर्णत: राजकीय आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ राजकीय विचार मांडण्याचे नाही. दुसरे म्हणजे आयोजकांची निवड चुकली असे म्हणावे लागेल. सहगल यांची विचारधारा, पुरस्कार वापसी प्रकरण हा सर्व इतिहास माहीत असताना त्यांची निवड कशी केली, याचे आश्चर्य वाटते.- वर्षा किडे कुळकर्णी, लेखिका