लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाहेर सुरू असलेला रिमझिम पाऊस...अन् सायंकाळी मो. रफी यांनी गायलेल्या गीतांची मैफिल...असा दुहेरी संगम नागपूरकर रसिकांनी अनुभवला. रसिकांची भरगच्च उपस्थिती असलेल्या साई सभागृहात गायक कलावंतांनी मो. रफी यांची सदाबहार अशी अजरामर गीते गाऊन रसिकांना चिंब केले. मोहम्मद रफी फॅन्स कल्चरल ऑर्गनायझेशनच्या वतीने मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शंकरनगरच्या साई सभागृहात ‘मेरे महबूब तुझे सलाम’ या गीतांच्या कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘मरहबा सैयदी’ या मो. सलीम यांच्या गीताने झाली. त्यानंतर विनोद दुबे यांनी ‘दिवाना कहके आज मुझे फिर पुकारिये’ हे गीत सादर करून रसिकांच्या टाळ्या घेतल्या. विलास डांगे यांनी ‘एक मुसाफिर को दुनिया मे क्या चाहिये’ हे गीत सादर केले. मो. सलीम, दीपक मांगलेकर यांच्या ‘बने चाहे दुश्मन’ या गीताने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. मो. सलीम यांनी ‘राही मनवा दुख की चिंता क्यू सताती है’, मो. सलीम, मनाली पांडे यांनी ‘क्या हुवा तेरा वादा’ हे गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. रमेश अय्यर आणि वर्षा रामटेके यांनी गायलेल्या ‘दिल उसे दो जो जान दे दे’, विलास डांगे, मुमताज यांनी चोरी चोरी या चित्रपटातील ‘तुम अरबो का हेर फेर करनेवाली रामजी’ हे गीत सादर केले. मो. सलीम, मनाली पांडे यांनी ‘हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए’ हे इंतकाम चित्रपटातील गीत सादर केले. ‘रोते हुए आते है सब’ या मो. सलीम, दीपक मांगलेकर यांनी गायलेल्या गीतावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. ‘ये परदा हटा दो, जरा मुखडा दिखा दो’ या राम खनगण, वर्षा रामटेके यांच्या गीताला रसिकांनी दाद दिली. विलास डांगे, मुमताज यांनी ‘अगं पोरी सभाल, दरियाला तुफान आयल भारी’ हे कोळी गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमात त्यानंतर गायक विनोद दुबे, मो. सलीम यांनी ‘सात अजुबे इस दुनिया मे’, मो. सलीम, वर्षा रामटेके यांनी ‘मेरे मेहबूब तुझे सलाम’, विलास डांगे, वर्षा रामटेके यांनी ‘कितना है तुमसे प्यार’, मो. सलीम, मनाली पांडे यांनी ‘ना ना करते प्यार’ ही गीते सादर करून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात ‘नागन सा रुप हे तेरा’, ‘फिर वही दिल लाया हु’, ‘जानु मेरी जान’, ‘यम्मा यम्मा’ ही गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या संयोजक प्रीती दास होत्या. संगीत संयोजन अजित भालेराव, गौरव टाकसाळे यांचे होते. गायकांना सेक्सोफोनवर अमित हत्तीठेले, ढोलकीवर नितीन जनवारे, ऑक्टोपॅडवर महेंद्र कुमार, तबल्यावर संदीप रामटेके यांनी साथसंगत केली. संचालन रेखा घिया-दंडिगे यांनी केले.सागर खादीवाला यांचा सत्कारकार्यक्रमात हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. सागर खादीवाला यांना ‘पद्मश्री मोहम्मद रफी अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोप भेट देण्यात आले. कार्यक्रमात पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित नगरसेविका प्रगती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, चंद्रशेखर चिखले, प्रकाश वाघमारे, कुमार काळे, राजेश लोंढे, कार्तिक शेेंडे, सतीश बैस यांनाही सन्मानचिन्ह, रोप देऊन सन्मानित करण्यात आले. नाट्य कलावंत रुपाली मोरे-कोंडेवार यांना आणि दर्शना नवघरे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.खाकी वर्दीतील कलावंत जागरुक झाला कार्यक्रमात संचालन करताना रेखा घिये यांनी सत्कार समारंभ आटोपल्यानंतर पाचपावलीचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना एक गाणे ऐकून जाण्याची विनंती केली. यावेळी मेश्राम यांच्यातील कलावंत जागरुक झाला. त्यांनी गाणे ऐकून नव्हे तर ऐकवून जातो...असे म्हणत माईकचा ताबा घेतला. त्यांनी ‘आने से उसके आये बहार’ हे सुमधुर गीत सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. खाकी वर्दीतही असा कलावंत दडलेला पाहून रसिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली.
‘ये परदा हटा दो, जरा मुखडा दिखा दो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:40 AM
बाहेर सुरू असलेला रिमझिम पाऊस...अन् सायंकाळी मो. रफी यांनी गायलेल्या गीतांची मैफिल...असा दुहेरी संगम नागपूरकर रसिकांनी अनुभवला. रसिकांची भरगच्च उपस्थिती असलेल्या साई सभागृहात गायक कलावंतांनी मो. रफी यांची सदाबहार अशी अजरामर गीते गाऊन रसिकांना चिंब केले.
ठळक मुद्देमो. रफींवरील गीतांनी रसिक मंत्रमुग्ध