लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ताशांचा आवाज झरररं झाला न गणपती माझा नाचत आला’ असे यंदा दिसणार नाहीच आणि दिसलेही तरी ते क्वचितच असेल. कोरोना संसर्गाचा परिणाम म्हणून ही स्थिती यंदा श्रीगणेशोत्सवावर ओढवली आहे. त्यामुळे, यंदा ढोल-ताशांचा आवाज होईल की नाही, याबाबत संशय आहे.नागपुरातील जवळपास सर्वच ढोल-ताशा-ध्वज पथक हे सामाजिक उपक्रमाअंतर्गत सुरू झालेले आहेत. त्यामुळे, कुठल्याही नादपथकांमध्ये ढोल-ताशा पथकांचे वेगळेपण कायम उठून दिसले आहे. त्यात आर्थिक गणितही असले तरी ते सर्व सामाजिक उपक्रमांसाठीच लावले जातात, हेही उघड सत्य आहे. मात्र, यंदा श्रीगणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले असल्याने आणि उत्सवास मर्यादित परवानगी दिली असल्याने दरवर्षी प्रमाणे यंदा तसा जल्लोष राहणार नाही, हे निश्चित झाले आहे.
शहरात ३०च्या जवळपास ढोल-ताशा-ध्वज पथके आहेत. मात्र, या पथकांना नाद करण्यास अद्यापही परवानगी दिली गेलेली नाही. त्यामुळे, हे पथके संघटितरित्या पोलीसांच्या मदतीला असणार आहे. शिवाय, यंदा कोणत्याही मंडळात वादन करण्यापेक्षा विशिष्ट ठिकाणी राहून शहरात श्रीगणेशोत्सवाची वातावरणनिर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे. फिजिकल डिस्टेन्सिंग, सामाजिक भान, निर्माल्य संकलन आणि इतर गोष्टींवर जनजागृती करण्यावर यंदा सर्वच पथकांचे लक्ष केंद्रित असणार आहे.शुक्रवारी बैठकपथकांची भूमिका यंदाच्या उत्सवात काय असेल, याबाबत सर्व पथकांची शुक्रवारी बैठक आहे. ११ दिवस असणाऱ्या या उत्सवात प्रत्येक पथकाला कुठे व कोणतही जबाबदारी मिळेल, हे या बैठकीतूनच स्पष्ट होणार असल्याचे बेधुंद ढोल-ताशा पथकाचे अमेय पाण्डे यांनी सांगितले.