निशांत वानखेडे
नागपूर : अंतराळ हे अनेक रहस्यांचे भंडार आहे. अमर्याद रहस्य आहेत ज्यांचा थांगपत्ता अद्याप मानवाला लागला नाही. मात्र अनेक मानवाने आकलनातही आणल्या आहेत. ज्या आकलनात आल्या आहेत त्यांच्याही हालचाली कुतूहल वाटणारी आहे. अशा कुतूहल वाढविणाऱ्या घडामाेडी यावर्षीही अंतराळात घडणार आहेत.
यावर्षी सूर्याला दाेनदा ग्रहण लागणार आहे. ते खंडग्रास असेल व एकदा ते भारतातून बघताही येईल. शिवाय दाेनदा पूर्ण चंद्रग्रहणाचा साेहळा अनुभवता येणार आहे. चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मधे येईल. पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिलला हाेईल. चंद्राच्या गडद सावलीचा शंकू दक्षिण ध्रुवावरून पृथ्वीवर पडणार आहे. दक्षिण पॅसिफिक महासागर व दक्षिण अमेरिकेतील लाेकांना याचे दर्शन हाेईल. मध्य आशियाई देश व भारतीयांना २५ ऑक्टाेबरची वाट पाहावी लागणार आहे. या दिवशी दुसऱ्यांदा सूर्यग्रहण पडेल. ते खग्रास असूनही भारतातून खंडग्रास दिसेल.
चंद्राची सावली पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर पडेल. पहिले चंद्रग्रहण १५-१६ मे राेजी असेल. अमेरिकेच्या बहुतेक भागात दिसेल. ८ नाेव्हेंबरला दुसऱ्यांदा चंद्रग्रहण हाेईल व उत्तर अमेरिकेसह पूर्व आशियाई देशातही अनुभवायला मिळेल. हा साेहळा १ तास २५ मिनिटे चालणार आहे.
पाच ग्रहांचे एका रांगेत दर्शन
जूनच्या शेवटच्या दाेन आठवड्यात पाच ग्रह पाहण्याची संधी अवकाशप्रेमींना आहे. सूर्याच्या रांगेत येणारे बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनि एका सरळ रेषेत दिसतील. यामध्ये चंद्रही असेल. पूर्व व दक्षिणपूर्व आकाशात पहाटेच्या वेळी ते उघड्या डाेळ्याने बघता येतील. १८ जूनला शनिचे दर्शन हाेईल. त्यानंतर २१ जूनला गुरु, २२ जूनला मंगळ, २६ जूनला शुक्र व २७ जूनला बुध ग्रहाचे स्पष्ट दर्शन हाेईल. चांगल्या टेलिस्काेपने ते एका रांगेत पाहता येईल. ५ एप्रिल राेजी ‘गाॅड ऑफ वाॅर’ म्हणजे मंगळ व ‘लाॅर्ड ऑफ रिंग’ म्हणजे शनि या दाेन ग्रहांची युती झालेली दिसेल.
अंतराळात आणखी बरेच काही
- १३ फेब्रुवारी ते २० मार्च या काळात दक्षिण पूर्व आकाशात चमकणाऱ्या शुक्राचे दर्शन घडेल. छाेट्या टेलिस्काेपने ताे लख्ख बघता येईल.
- २ मार्च बुध-शनि युती. १२ मार्च मंगळ-शुक्र युती.
- २१ एप्रिलला पश्चिम उत्तर-पश्चिम आकाशात पॅनस्टार धूमकेतू जाताना दिसेल. इतर धूमकेतूंचे दर्शन हाेण्याची शक्यता कमी.
- २७ ते ३० एप्रिलच्या काळात पूर्व व दक्षिण पूर्व हाेरिझाेनमध्ये गुरु, शुक्र व मंगळाची युती झालेली पाहता येईल.
- ३० व ३१ मे राेजी संथगती उल्कावर्षाव हाेताना पाहता येईल. १२ ऑगस्ट राेजी पर्सिड उल्कावर्षाव हाेईल.
- १३ जुलै राेजी ३,५७,२६४ किलाेमीटर अंतरावर पूर्णचंद्र (फूल मून) दर्शन.
- ७ व ८ डिसेंबरला मंगळ व चंद्राच्या युतीचा आकर्षक नजारा बघता येईल.
- १३ व १४ डिसेंबरला मिथून उल्कावर्षाव हाेताना पाहणे नयनरम्य ठरेल.