- कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेतील भयावह स्थितीचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इटलीमध्ये मृत्यूंचा तांडव माजवल्यानंतर भारतात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि त्यानंतर लागू झालेली टाळेबंदी, हे सगळेच नवे होते आणि पुढे काय होणार, याची प्रचंड उत्सुकताही होती. संकटाच्या काळात एकमेकांना धीर देण्यात क्रिएटिव्ह व्हिडिओ मेकर्सचा मोठा हातभार त्यावेळी लागला होता. युट्यूबवर एका पाठोपाठ अनेक व्हिडिओ अपलोड केले जात होते. कोरोना वॉरिअर्सचे गोडकौतुक, कोरोनाविरोधात संघटित होण्याच्या प्रेरणा देणारे संदेश आणि कॉपीपेस्ट गाण्यांवर स्वत:चे अपिअरन्स असलेले व्हिडिओ भलमार अपलोड केले जात होते. हा उत्साह कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत पार ओसरल्याचे दिसून येत आहे.
कोरोनासारख्या सार्स, इबोला संक्रमणाची झळ यापूर्वीही जगभराने बघितली आहे; मात्र सतर्कतेने हे विषाणू अन्य देशांच्या सीमा ओलांडू शकल्या नाहीत. भारतीय नागरिकांनीही या सगळ्यांची दखल घेतली; मात्र कळायच्या आत कोरोना विषाणू सर्वत्र पसरला आणि त्याचा भारतातही प्रवेश झाला. अशा स्थितीत फ्रंट वर्कर्स कशा तऱ्हेने कार्य करते, याची उत्सुकता कलाप्रेमींमध्ये होती. त्या अनुषंगाने एकमेकांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रिएटिव्ह व्हिडिओजची गणती प्रचंड वाढली होती. युट्यूब, फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी सगळी सोशल मीडिया अशा क्रिएटिव्ह व्हिडिओजनी भरलेली होती. पहिली लाट ओसरली आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि आपण जिंकलो, अशा अविर्भावात सगळेच राहिले; मात्र दुसरी लाट येताच आणि त्यामुळे बघितलेले आरोग्य यंत्रणेचे विभत्सदृष्ट्य व मृत्यूंचा कांगावा यांनी सगळेच हादरले. हा हादरा इतका भयंकर होता की जवळपास सगळ्या कुटुंबांना याची झळ पोहोचली आहे. या भयात क्रिएटिव्ह व्हिडिओजची क्रिएटिव्हिटी ओसरली असल्याचे दिसून येत आहे.
-----------------
संक्रमण आणि टाळेबंदीविषयीची उत्सुकता संपली
लॉकडाऊन हा शब्द उद्योगक्षेत्रापुरता मर्यादित होता; मात्र लॉकडाऊनने सगळेच विश्व जागच्या जागी थांबले जाऊ शकते, हा विषय नवा होता. कलम १४४ आणि लॉकडाऊनचा अनुभव प्रत्यक्षात कुणालाच नव्हता. त्यामुळे त्याचे आकर्षणही प्रचंड होते; मात्र गेल्या १४ महिन्यात जागतिक त्रासदी आणि घरात बसून राहणे हे काय असते, याचा अनुभव उत्तम प्रकारे आला आहे. आता कलावंतांमध्येही संक्रमण व टाळेबंदीविषयीची उत्सुकता संपल्याने क्रिएटिव्ह व्हिडिओ मागे पडले आहेत.
------
दुसऱ्या लाटेची बाधा सगळ्यांनाच
जोवर आपल्या अंगावर येत नाही तोवर संकटाची भीषणता कळत नाही. असेच पहिल्या लाटेत झाले. दुसऱ्या लाटेची बाधा जवळपास सर्वच कुटुंबांना झाली. अनेकांनी आप्त गमावले. अशा संकटात मनोरंजनात्मक म्हणा वा प्रबोधनात्मक क्रिएटिव्हिटीही बाधित झाल्याचे चित्र आहे.
------------
धास्ती आणि आर्थिक स्थितीने क्रिएटिव्हिटी लांबली
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट पाच पटीने भयंकर ठरली. संक्रमणाचा वेग प्रचंड होता. त्यात आर्थिक कंबरडे आधिच मोडले गेले होते. शिवाय, बाधित आणि मृत्यूंमध्ये तरुणांची संख्या अधिक होती. या सगळ्या धास्तीत क्रिएटिव्हिटीकडे दुर्लक्ष झाले.
..................