लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मान्सूनच्या अनियमिततेवरून हवामान बदलामुळे हाेणाऱ्या परिणामांचे संकेत सहज लक्षात येतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास लांबत चालला आहे व ताे यावर्षीही कायम आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास २९ सप्टेंबरनंतरच सुरू हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
साधारण १७ सप्टेंबरदरम्यान पावसाळ्याचा परतीचा काळ गृहित धरला जाताे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून यात बदल हाेत आहेत. हवामान विभाग दिल्लीचे के. एस. हाेसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीही परिस्थिती बदललेली आहे. वातावरणात एकापाठाेपाठ एक बदल घडून येत आहेत. सध्या मध्य प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे आणि पाऊसही हाेत आहे. यामुळे विदर्भातही पावसाळी वातावरण आहे. यानंतर शनिवारी, रविवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, ते वायव्य दिशेला सरकत आहे. ही परिस्थिती विदर्भात पावसासाठी कारणीभूत ठरली आहे.
मान्सूनदरम्यान विदर्भ व महाराष्ट्रात एकतर अरबी समुद्रात बदल झाल्याने किंवा दुसरे बंगालच्या उपसागरात बदल झाल्याने पावसाळी वातावरण तयार हाेते. सध्या अरबी समुद्रातील वातावरण शांत आहे, पण बंगालच्या उपसागरात सातत्याने बदल घडत आहेत. यामुळे मध्य प्रदेश, रायपूर, विदर्भ, मराठवाडा या भागात पावसाचा जाेर कायम आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये चार आठवड्यांचे अनुमान नाेंदवले आहे. दि. १७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. दि. २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशात चांगला पाऊस हाेईल. दि. १ ते ७ ऑक्टाेबरदरम्यान उत्तर-पश्चिम तसेच मध्य भारतात पावसाचे अनुमान आहे. यावरून राजस्थानकडून सुरू हाेणारा परतीचा प्रवास लांबण्याची चिन्ह आहेत. दि. ८ ते १४ ऑक्टाेबरदरम्यान पावसाचा जाेर ओसरेल पण देशात सर्वत्र सामान्य पाऊस हाेण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
साेमवारी, मंगळवारी विदर्भात जाेरदार पाऊस
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. २०, २१ सप्टेंबरदरम्यान विदर्भ, मध्य प्रदेशात चांगला पाऊस हाेईल. साेमवारी पूर्व विदर्भ म्हणजे गाेंदिया, भंडारा, गडचिराेली भागात जाेरदार पाऊस हाेईल. त्यानंतर मंगळवारी नागपूरसह वर्धा, अमरावती, अकाेला या भागात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.