लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलची निवड झाल्यानंतर चाचणीसाठी आतापर्यंत ३० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. परंतु संबंधितांना २९ निकषाच्या दिव्यातून जावे लागणार असल्याने यातील किती लोक चाचणीसाठी फिट राहतील, हे सांगणे अद्याप कठीण असल्याचे हॉस्पिटलचे म्हणणे आहे.
कोरोनावर प्रभावी ठरेल असे औषध किंवा प्रतिबंधात्मक लस तयार नाही. परंतु भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) ने 'कोव्हॅक्सिन’ नावाच्या लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. यासाठी देशात १२ सेंटरची निवड केली आहे. यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निवड झाली आहे. ही लस भारत बायोटेकने ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत एकत्र येऊन तयार केली आहे.
या प्रतिबंधात्मक लसीवर प्री-क्लिनीकल ट्रायल न्यूझीलँड व इतर देशात झाले आहे. भारतात पहिल्यांदाच या लसीची मानवी चाचणी केली जात आहे. डॉ. गिल्लूरकर म्हणाले, प्रतिबंधात्मक लसीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी हॉस्पिटलमध्ये फोन करून मानवी चाचणीसाठी इच्छा व्यक्त केली. यातील १८ ते ५५ वयोगटातील तूर्तास ३० व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे.