नागपूर : राज्य शासनाने ‘हर घर जल’ व ‘जलजीवन मिशन’अंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र या वर्षी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आणि ९ जिल्ह्यांतील ३१४ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. राज्य शासनानेच विधानपरिषदेत ही कबुली दिली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीसमस्या निर्माण होण्याचीच भिती आहे.
राजेश राठोड, भाई जगताप, अभिजीत वंजारी इत्यादी सदस्यांनी राज्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे-वाड्यांबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखी उत्तरातून शासनाची भूमिका मांडली. ऑक्टोबरच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ३१४ गावे व ९९२ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. ३५ शासकीय व २८९ खाजगी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८७ टॅंकर्सने पुरवठा करण्यात आला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे शासनाच्या उत्तरात नमूद आहे.