लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समुद्रमंथनात मेरू पर्वताला वासुकी नागाच्या साहाय्याने देव-दानवांनी जेवढे मंथले तेवढे उपहार या जगताला प्राप्त झाले. तसेच उपहार प्राचीन भारताच्या जेवढ्या खोलात शिरत जाऊ, तितके बाहेर येतील. योगसाधना ही त्यातीलच एक अनन्यसाधारण देणगी आहे. ऋषीमुनींनी सृष्टीतील चराचराचा सुगंध आत्मसात करत त्यास आत्मिक अनुष्ठान प्राप्त करून दिले आणि आरोग्यवर्धनाचा बिगुल वाजविला, तोच योग म्हणजे योगसाधना होय. ही योगसाधना आंतरराष्ट्रीय योग दिनी घराघरात साजरी होणार आहे.यंदा कोरोनाच्या सावटात आंतरराष्ट्रीय योग दिन पार पडत आहे. त्यामुळे, सामूहिक योगसाधनेला तडे जाणार असले तरी वैयक्तिक साधनेला उपरती येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन अॅपद्वारे योगशिक्षक साधकांना मार्गदर्शन करतील आणि घरोघरी योगासने केली जाणार आहेत. त्यामुळे, वस्तोवस्ती, बागेत अगर पटांगणात किंवा ओपन स्पेसवर बांधण्यात आलेले ‘योगा शेड्स’ सुनेसुने दिसणार आहेत. एरवी दररोज सकाळ-संध्याकाळ विविध योगमंडळी या शेड्समध्ये ओंकाराच्या ध्वनिगजरात योगसाधना करत असल्याचे चित्र सगळ्यांच्याच परिचयाचे होते. मात्र, कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने एकत्रीकरणालाच मज्जाव करण्यात आला आणि गेल्या तीन महिन्यापासून ही योगा शेड्स उदास पडले आहेत. त्यामुळे, यंदा सामूहिक योगासनांचे सोहळे आयोजित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे, धंतोली भागात असलेले यशवंत स्टेडियम, रेशीमबाग मैदान आणि अन्य बगिचे रिकामेच असणार आहेत.घरीच करा योगसाधना - रूपाली वांदेयोगसाधना आरोग्यासाठी केली जाते. यंदा कोरोनामुळे संसर्गाचा धोका जास्त असल्याने नागरिकांनी घरूनच योगसाधना करावी आणि योग दिन साजरा करावा. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेनुसार सकाळी ७ ते ८ या वेळेत आम्ही आॅनलाईन मार्गदर्शन करत साधकांना आसने सांगणार असल्याचे मुद्रा योग सर्टिफिकेशनच्या परीक्षक रूपाली वांदे यांनी सांगितले.सकाळी ५ ते ८ साजरा करू योग दिन - माया हाडेपतंजली योगसमिती आणि योगगुरू रामदेव बाबांनी केलेल्या आवाहनानुसार सकाळी ५ ते ८ या वेळेत घरूनच योगदिन साजरा करण्यात येणार आहे. सामूहिक योग अभ्यासिका अद्याप सुरू झालेल्या नाहीत. ज्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत तेथे दहाच्या वर संख्या नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग जरूर करावा पण घरूनच अगर फिजिकल डिस्टन्सिंग जपून करावा, असे आवाहन पतंजली योग समितीच्या पश्चिम विभाग प्रमुख माया हाडे यांनी सांगितले.सहा वर्षात संपूर्ण पृथ्वी योगमयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांनी २१ जून २०१५ पासून युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय योग दिन पाळण्याची घोषणा २०१४मध्ये केली होती. या घोषणेपाठी जगभरातील सर्व देशांनी पूर्णसंमती दर्शवली होती. योगसाधना ही कोण्या एका धर्माची मक्तेदारी नव्हे तर संपूर्ण मानव जमातीला चैतन्य प्रदान करणारी क्रिया आहे, हे त्यावेळी एकमताने मान्य झाले. तेव्हापासून ते आजतागायत सहा वर्षाच्या काळात या भारतीय देणगीने संपूर्ण पृथ्वीला योगमय केले आहे. २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. योगक्रियाही मानवाचे आयुष्य वृद्धिंगत करते. हाच योग साधत हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला.
योग दिन विशेष : योगसाधना चराचरात, होणार घराघरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:15 PM
ऋषीमुनींनी सृष्टीतील चराचराचा सुगंध आत्मसात करत त्यास आत्मिक अनुष्ठान प्राप्त करून दिले आणि आरोग्यवर्धनाचा बिगुल वाजविला, तोच योग म्हणजे योगसाधना होय. ही योगसाधना आंतरराष्ट्रीय योग दिनी घराघरात साजरी होणार आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘योगा शेड्स’ असतील सुनेसुने