अंकिता देशकर
नागपूर : योग हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरास बळ मिळते आणि मानसिक एकाग्रतेस मदत करते. जीवनशैलीत योगाचा समावेश केल्यास अनेक गंभीर आजारांना दूर ठेवता येते; परंतु कुटुंबाला सर्वाेच्च प्राधान्य देणाऱ्या भारतीय महिला योगसाठी वेळ काढत नाहीत ही समस्या पाहता, योगगुरू दादामुनी राजाभय्या हांडा यांनी पुढाकार घेत सहज जीवन योग साधनाअंतर्गत केवळ ४० मिनिटांत करता येणारी योग कला विकसित केली आहे.
दादामुनी यांच्या मते, सहज जीवन योग दैनंदिन जीवनातही रूजवला जाऊ शकतो. यामध्ये छोट्या-छोट्या क्रियांचा समावेश असून जे बोटांच्या टोकापासून ते डोक्याच्या टोकापर्यंत काम करतात. टाळ्या वाजवणे, दोन्ही हातांची बोटे जोडणे आदी छोट्या व्यायामांचा समावेश आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगासने योग्य स्वरूपात करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराची लवचिकता आणि रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.
-अनेक वर्षांचे संशोधन
दादामुनी म्हणाले, अनेक वर्षांच्या संशोधनानंतर ४० मिनिटांचा हा ‘विश्रांतीचा स्रोत : सहज जीवन योग’ विकसित केला आहे. यासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक सामग्रीचे वाचन केले. यातून एक नित्यक्रम तयार केला. सहज जीवन योग हा योग्यरीत्या शिकल्यानंतर घरीही करू शकतात. तरुण आणि वृद्ध दोघांनीही मन:शांतीसाठी दररोज योग साधना करावा. अशा योगामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो.