लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. राममंदिराचा मुद्दा तापला असताना प्रथमच संघभूमीत येणारे योगी संघ मुख्यालयात जातील, असे कयास वर्तविण्यात येत होते. मात्र त्यांनी संघस्थानाला भेट देण्याचे टाळलेच.सद्यस्थितीत राममंदिराच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. सोबतच राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी संघ परिवार व विश्व हिंदू परिषदेतर्फे अयोध्या, वाराणसी व नागपूर येथे २५ नोव्हेंबर रोजी हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ संघस्थानाच्या शेजारीच येणार असल्याने ते संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.योगी आदित्यनाथ नियोजित वेळापत्रकानुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावर आले. त्यानंतर ते थेट रेशीमबाग मैदान येथील ‘अॅग्रोव्हिजन’च्या कार्यक्रमस्थळी आले. कार्यक्रम झाल्यानंतर ते बाजूलाच असलेल्या हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात जातील, असा अंदाज होता. मात्र योगी आदित्यनाथ थेट विमानतळाकडे रवाना झाले. तसेदेखील सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुरात नव्हते. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची कुणाशी भेट झालीच नसती, असे सूत्रांनी सांगितले.भाषणादरम्यान लागले ‘जय श्रीराम’चे नारेदरम्यान, कार्यक्रमादरम्यान योगी आदित्यनाथ भाषण द्यायला उभे झाले आणि उपस्थितांमधून काही शेतकऱ्यांनी ‘जय श्रीराम’ तसेच राममंदिराच्या समर्थनार्थ नारे लावायला सुरुवात केली. भाषणात योगी आदित्यनाथ राममंदिर किंवा निगडीत राजकीय भाष्य करतील, असे उपस्थितांना वाटत होते. मात्र प्रत्यक्षात योगी आदित्यनाथ यांनी भाषणाचा संपूर्ण रोख हा कृषी, शेतकरी व उत्तर प्रदेशमधील स्थिती यांच्यावरच ठेवला.