नागपूर: मुलींनी स्वत:ची सुरक्षा स्वत: कशी करावी, सतर्क कसे राहावे आणि संभाव्य गुन्हा टाळण्यासाठी त्यांनी काय करावे, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारी ‘पोलीसदीदी सक्रिय’ झाली आहे. शहर पोलिसांच्या वतीने मुलींच्या सुरक्षेच्या संबंधाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत शाळा-शाळांमध्ये जाऊन ती मुलींना सुरक्षेच्या टिप्स देत आहे.
शाळा सुरू होताच मुलींना एका वेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते. सडकछाप मजनू येता-जाता त्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष छेड काढून त्यांना मानसिक त्रास देतात. विकृत नजरा, पाठलाग, टोमणे असा हा प्रकार असतो. शाळेंमधील काही विद्यार्थीही प्रेमाच्या नावाने त्यांना छळत असतात. या गैरप्रकारामुळे मुलींची घुसमट होते. तिच्यावर बदनामीचे दडपण येते. घरच्यांना सांगावे तरी कसे, असा प्रश्न असल्याने ती आतल्या आत कुढत असते. तिच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.
दुसरीकडे नैसर्गिक आकर्षणामुळे ती प्रेमाची साद घालणाऱ्याकडे आकृष्ट झाली, तर नको त्या अडचणी निर्माण होतात. नंतर ब्लॅकमेलिंग अन् बलात्कारासारखे गुन्हेही घडतात. हे सर्व टाळण्यासाठी आणि शालेय वयातच मुलींना सजग बनविण्यासाठी शहर पोलिसांनी ‘पोलीसदीदी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळेत जाऊन महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी शाळकरी मुलींचे समुपदेशन करीत आहेत. त्यांना गुड टच, बॅड टचमधील फरक कसा ओळखायचा, कुणी प्रत्यक्ष किंवा मोबाईलवर संदेश पाठवून ‘तू खूप छान आहे. खूपच सुंदर दिसतेस’ अशा प्रकारचे किंवा अन्य कोणतेही मेसेज पाठविले तर काय करायचे, त्यासंबंधीचे मार्गदर्शन केले जात आहे. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापुरातील विविध शाळांमध्ये शुक्रवारी, शनिवारी या संबंधाने मुलींचे समुपदेशन वर्ग घेण्यात आले आहे. वर्गात सुरक्षेचे प्रात्यक्षिकही मुलींना दाखविण्यात येत आहे.
घाबरू नका, आम्हाला कळवा
अशा प्रकारच्या त्रासाला बळी पडलेल्या मुली घाबरतात. घरच्यांचा धाक, बदनामीची भीती यामुळे त्या कुणाजवळ व्यक्त होत नाही. त्यामुळे त्रास देणाऱ्या आरोपीची हिम्मत वाढते. यातूनच तिला पळवून नेणे, बलात्कार करण्यासारखे गुन्हे घडतात. ते घडू नये म्हणून मुलींनी घाबरू नये, थेट पोलीसदीदीकडे माहिती द्यावी, असे सांगितले जात आहे. पोलीसदीदीचे मोबाईल नंबरही शाळकरी मुलींना उपलब्ध करून दिले जात आहेत.
----