अरुण महाजन/विजय भुते
खापरखेडा/पारशिवनी : पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहायला लागल्या की धबधबे, तलाव व नदीच्या काठी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढताे. नागपूर जिल्ह्यात पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीच्या पात्रातील धबधबा वगळता अन्य कुठेही धबधबा नाही. त्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील पर्यटक कन्हान नदीच्या काठी असलेल्या वाकीसह अन्य तलावाच्या परिसरात फिरायला जातात. पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीच्या पात्रात असलेले महादेवाचे मंदिर नागपूर जिल्ह्यात श्री क्षेत्र घोगरा महादेव या नावाने प्रसिद्ध आहे. संथ वाहणारी पेंच नदी, पात्रात मध्यभागी असलेले मंदिर, सभाेतालची वनराई व हिरवागार परिसर पर्यटकांना माेहित करताे. अलीकडे ‘सेल्फी’ घेणे ही ‘फॅशन’ झाली आहे. परंतु, ‘सेल्फी’ काढताना ताेल जाऊन जीव गमावण्याची वेळ ओढवू शकते, हे मात्र ‘सेल्फी’ काढणाऱ्यांच्या ध्यानीमनी नसते. त्यामुळे ‘सेल्फी’ काढताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
...
वाकी हूड
पारशिवनी तालुक्यातील वाकी शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रातील ‘वाकी हूड’ हा डाेह अलीकडच्या काळात ‘डेथ पाॅईंट’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. हा डाेह तरुण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. येथे तरुण ‘सेल्फी’ तर काढतात. शिवाय, पाेहायलाही उतरतात. या डाेहात आजवर ७० तरुण-तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. या डाेहात बुडून जो विल्सन या २४ वर्षीय केनियन विद्यार्थ्याचा १५ ऑगस्ट २००१ राेजी मृत्यू झाला. ताे नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी हाेता. मृतांमध्ये सुशिक्षित व शहरी तरुणांची संख्या अधिक आहे.
...
सूचनाफलकाकडे कानाडाेळा
वाकी येथील हूड डाेहाजवळ प्रशासनाने सूचनाफलक लावून डाेहात कुणीही पाेहायला उतरू नये अथवा काठावर ‘सेल्फी’ काढू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या डाेहात आजवर कितीजणांचा बुडून मृत्यू झाला, याची नाेंदही एका सूचनाफलकावर केली आहे. परंतु, तरुण पर्यटक या सूचनाफलकांकडे कानाडाेळा करतात. घाेगरा महादेव येथील धबधब्याजवळ असेच सूचनाफलकही लावण्यात आले असून, पर्यटकांना ‘सेल्फी’ काढू नये, डाेहात उतरू नये, अशा सूचनाही केल्या आहेत; मात्र, तरुण या सूचनांचे पालन करीत नाहीत.
...
प्रेमी युगुल व ओली पार्टी
वाकी येथील हूड डाेहाजवळ माेठे व उंच खडक तसेच दऱ्या आहेत. या खडक व दऱ्यांमध्ये प्रेमी युगुले गप्पा मारत व चाळे करीत बसतात. ‘सेल्फी’ही काढतात. खडकावर ‘सेल्फी’ काढताना ताेल जाऊन खाली काेसळण्याची शक्यताही असते. याच ठिकाणी ओल्या व मांसाहारी पार्टीही केली जाते. या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तूंचा खच दिसून येताे.
..