लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कधीकाळी आठ रुपयांची सौरऊर्जेची वीज आता २ रुपये ६० पैशांवर आली. ही वीज आता गावागावात जोडायची आहे. सर्व नळयोजना सौर ऊर्जेवर शिफ्ट करायच्या आहेत. हा संकल्प पुढे न्यायचा असून आधी स्वत:च्या गावात स्वत:चा सौर प्रकल्प तयार करा. दोन सिमेंटचे रस्ते कमी करा. नालीचे काम तूर्त थांबवा, ते नंतर करू. असे म्हणत, मी तुमच्या उमरेड शहरातील वीज यंत्रणा ‘भूमिगत’ करतो, असा शब्द राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड येथील कार्यक्रमात दिला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बावनकुळे बोलत होते.यावेळी मंचावर खासदार कृपाल तुमाने, आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर जिल्हा वीज नियंत्रण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख, पालिकेच्या नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आनंद राऊत, जयकुमार वर्मा, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे, पंचायत समितीच्या सभापती शालु मेंढुले, भिवापूर पंचायत समितीचे सभापती केशव ब्रम्हे, कुही पंचायत समितीच्या सभापती सुनीता पडोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, भिवापूर नगरपंचायतच्या अध्यक्षा किरण नागरीकर, कुही नगरपंचायतच्या अध्यक्षा चंदा वानखेडे आदींची उपस्थिती होती.डिसेंबर अखेरीस १७ लाख कुटुंबीयांपर्यंत वीज पोहचेल. ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर ट्रान्सफार्मर करणे, ट्रिपींग बंद करणे, प्रशासकीय कार्यालयाची रचना करणे आदी महत्त्वपूर्ण कामेही लवकरच पूर्ण होतील. फिडरवर जास्त ट्रिपींग निघाले तर वेतनकपात करणार असा इशारा देत फिडरमध्ये ‘फिट’ राहा. वीज ही सेवा आहे. जनतेला सेवा द्या, अशीही बाब बावनकुळे यांनी व्यक्त केली.
गावागावात ‘ग्राम मॅनेजर’राज्यातील २३ हजार ग्रामपंचायतीमध्ये लाईनमन नाही, ही खंत व्यक्त करीत ‘ग्रामविद्युत व्यवस्थापक’ गावागावात नेमायचे आहेत. या ग्राम मॅनेजरच्या माध्यमातून गावाच्या विजेचा कारभार चालेल. पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात ७७८ मुलांची नियुक्ती उंबरठ्यावर आहे. या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा अधिकाधिक मजबूत होईल. शिवाय गावपातळीवर हकनाक बळीही जाणार नाहीत, ही बाब चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.