नागपूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जमिनीशी जुळून काम कसे करायचे, हे शिकले पाहिजे. नौटंकी करून मते मिळविता येत नाहीत, हे त्यांच्यासोबत मविआच्या नेत्यांना समजायला हवे. प्रचारात मुद्देच नसल्याने मविआ नेत्यांकडून दिशाभूल करण्यात येत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपूरचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मतदारसंघात रविवारी फडणवीस यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. "विधानसभा निवडणुकीत आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जात आहोत. मात्र, काँग्रेस व विरोधक केवळ तथ्यहीन बाबींवर जनतेची दिशाभूल करीत आहेत. काँग्रेसला केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करायचे आहे. महाविकास आघाडीमध्ये नेतेपदावरून भांडणे आहेत, तर आमच्याकडे कुठलीही स्पर्धा नाही. येणाऱ्या २० तारखेला प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘त्यांनी व्होट जिहादचा नारा दिला; मग आमच्यासाठी मतांचे धर्मयुद्धच’
नाशिक : सत्तेसाठी विरोधक हिंदुत्व विसरले असून, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून व्होट जिहादचा नारा दिला आहे. हा नारा महाविकास आघाडीला मान्य आहे. त्यामुळे मग ही विधानसभा निवडणूक आमच्यासह राज्यातील मतदारांसाठी मतांचे धर्मयुद्धच आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत व्यक्त केले. ‘लावरे तो व्हिडीओ’ म्हणत त्यांनी नोमानी यांची कथित क्लीप ऐकवून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित केले. स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी सायंकाळी ही सभा झाली.
फडणवीस म्हणाले की, व्होट जिहादचे म्होरके कोण आहेत, हे तुम्ही ऐकले आहे. व्होट जिहादसाठी हे उलेमांचे तळवे चाटत आहेत. दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ, असे आश्वासन विरोधकांनी नोमानी यांना दिले असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. चांदवड येथील सभा आटोपून ते नाशिकच्या सभेसाठी आले असता हेलिपॅडवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बॅग तपासली.