नागपूर : शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था व पार्किग सुविधांची समस्या सोडवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आमआदमी पार्टीच्या कार्यक र्त्यानी पक्षाचे संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात शनिवारी महापालिकेच्या सिव्हिल लाईन येथील कार्यालयावर धडक दिली. यामुळे मनपा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलकांनी कार्यालयात शिरू नये यासाठी मेन गेट बंद करण्यात आले होते. नादुरुस्त रस्त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी, दोषी अधिकारी , ठेकेदार व लोकप्रतिनिधीवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे, मनपा सेवेतील अभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, ओसीडब्ल्यूने खोदलेले खड्डे तातडीने बुजवण्यात यावे, रोडवरील खड्ड्यात माती न टाकता डांबरीकरण करण्यात यावे, खड्ड्यामुळे जखमी होणाऱ्यांवर मनपाने मोफत उपचार करावे. तसेच शहरातील पार्किगची समस्या सोडविण्यात यावी, सार्वजनिक ठिकाणी असलेले पे- अॅन्ड पार्क बंद करावे, इमारत बांधकामाला अनुमती देताना पार्किंग आवश्यक करावी, आदी मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. (प्रतिनिधी)
आप कार्यकर्त्यांची मनपावर धडक
By admin | Published: August 03, 2014 12:56 AM