नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव लागल हाेतं. कारगिल युद्धात २० ते ३५ वर्षांच्या ५२७ वीरपुत्रांनी भारतमातेसाठी प्राणार्पण केले हाेते. त्यातीलच एक शाैर्यपूर्ण गाथा आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची.
पाकिस्तानी सैन्यात ‘शेर शाहा’ या टाेपण नावाने ओळख हाेती. कॅप्टन विक्रम व कॅप्टन संजीव जमवाल यांच्या नेतृत्वात कारगिलच्या पाॅईंट ५१४० वर विजय मिळविला हाेता. १७,००० फूट उंचीवर केलेल्या या ऑपरेशनमधे एकही जीवहानी न होता पाकड्यांना हाकलून येथे १३ जम्मू काश्मीर लाईट इन्फन्ट्रीच्या सैनिकांनी कब्जा केला व तिरंगा ध्वज फडकाविला. त्यांची व्हिक्ट्री साईन पाहून हर्षाेल्हासित झालेल्या सेनाध्यक्ष जनरल व्ही. मलिकनी अभिनंदन करून तुला काय हव, असे विचारले. विक्रम बत्रा उत्तरले, ‘सर ये दिल मांगे माेअर...’ या पाॅईंटवर विजय मिळविल्यानंतर २६ जूनपर्यंत तेथे मुक्काम केला. त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात परतल्यानंतर पुन्हा पाक सैनिकांनी कब्जा केलेल्या ‘पाॅईंट ४८७५’ च्या माेहिमेसाठी सज्ज झाली. ६ जुलैपर्यंत या पाॅईंटवर विजय मिळविता आला नव्हता, त्यामुळे कॅप्टन बत्रा यांच्या कंपनीला तेथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅप्टन बत्रा यांची कंपनी तेथे पाेहचताच तेथील भारतीय सैनिकांमध्ये स्फुरण निर्माण झाले. पाकिस्तानी सैनिकांकडेही ही बातमी पाेहचली. ‘शेर शाहा, उपर आ गये पर वापस नही जाने देंगे...’, असा दंभ त्यांनी भरला. विक्रम यांनीही ‘उपर हम नही, तुम्हे भेजेंगे’, असे उत्तर दिले. त्यानुसार ७ जुलैच्या रात्री त्यांनी लेजवर हल्ल्याची तयारी केली. थकवा व ताप असतानाही. बर्फवृष्टीमुळे हाड गाेठविणाऱ्या थंडीत ही कंपनी लढण्यास सज्ज झाली.
कॅप्टन विक्रम यांनी या पाॅईंटवर माेठ्या शाैर्याने शत्रूला नामाेहरम करून पराजित केले. त्यावेळचा प्रत्यक्ष घटनाक्रम शरीरात कंपने निर्माण करणाराच आहे. यावेळी शत्रूच्या गाेळ्यांनी ते जखमी झाले हाेते. या दरम्यान स्फाेटात पाय तुटलेल्या सहकाऱ्याला वाचविण्यास ते त्याच्या जवळ गेले. सुभेदारांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ‘तुम्ही मुलाबाळाचे माणूस आहात, तुम्हीच मागे हटा’, असा आदेश देत समाेर जाऊन जखमी सहकाऱ्याला खडकामागे आणले. मात्र यावेळीच लपून असलेल्या शत्रूने त्यांच्या छातीवर गाेळ्या झाडल्या. या वीरपुत्राने त्या जागी आपला देह ठेवला. ‘गड आला पण सिंह गेला’, याप्रमाणे पाॅईंटवर विजय मिळविला पण सिंह धारातीर्थी पडला. कॅप्टन विक्रम यांना मरणाेपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कॅप्टन विक्रम हे बालमैत्रिण डिम्पलशी लग्न करणार हाेते पण त्याआधीच देवाकडे जावे लागले. त्यांचे स्मरण करताना ही बालमैत्रिण लिहिते, ‘तुझ्या आठवणीतून वेगळे हाेणारा एकही दिवस जात नाही. लाेक तुझ्याबद्दल विचारतात तेव्हा आजही गर्व वाटतो व उर भरून येताे. तू माझ्या हृदयात, आयुष्यात सदैव राहशील व आपण पुन्हा भेटू. मात्र तुझ्याच शाैर्यगाथा ऐकायला तू येथे हवा हाेतास विक्रम...’