नागपूर : नागपूर महापालिकेत आता दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात 'हॅलो'ऐवजी 'वंदे मातरम'ने होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही महापालिकेत फोन केल्यास वंदे मातरम हे शब्द तुमच्या कानी पडतील. यासंबंधीचे परिपत्रक महापालिकेने जारी केले आहे.
नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयातून दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात ही हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने केली जाईल. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेतील सर्व विभागप्रमुख, दहाही झोनचे साहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांना काही सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. तसेच, 'वंदे मातरम' अभिवादनाचा अधिकाधिक वापर करून अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती घोषणा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभयांगतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने सुरुवात करावी असा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला होता. मात्र, त्याला होत असलेला विरोध लक्षात घेता मुनगंटीवार यांनी वंदे मातरम म्हणण्याचा निर्णय वनखात्यापुरता मर्यादित असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.