लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांना स्वरसाज प्रदान केला आहे. त्यातील आवर्जुन उल्लेख करावा असे नाव म्हणजे शम्मी कपूर. आपल्या अनोख्या हावभावासह अभिनयाने दर्शकांमध्ये खास पसंती मिळालेले शम्मी कपूर यांच्यासाठी रफीसाहेबांनी गायलेल्या गीतांनी श्रोत्यांवर जादू केली. त्या गीतांचे माधुर्य रसिकांनी बुधवारी अनुभवली.हार्मोनी इव्हेंट्सतर्फे सायंटिफिक सभागृहात ‘हिट्स ऑफ मोहम्मद रफी फॉर शम्मी कपूर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन राजेश समर्थ यांचे होते. नुकत्याच झालेल्या मोहम्मद रफी यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्यात आली. प्रसिद्ध गायक ज्योतिरमन अय्यर व आकांक्षा नगरकर यांनी आपल्या मधूर गायनासह स्वरानंदाचा हा अमिट ठेवा मोहक अंदाजात सादर केला. प्रतिभावान कवी-शायरचे अभिजात शब्द व संगीताची सहजसुंदर धून असलेल्या शेकडो वैविध्यपूर्ण गीतांना स्वरसाज देउन हरहुन्नरी रफीसाहेबांनी अमर केले आहे. शम्मी कपूरसारख्या कलावंतांचा सिद्धहस्त अभिनयही या गीतांना लोकप्रिय करणारा ठरला. शम्मी यांचा रोमँटिक अंदाज रफीसाहेबांनी स्वरातून खुबीने व्यक्त केला. जीवन ज्योती चित्रपटापासून सुरू झालेले हे अनुबंध पुढे अनेक चित्रपटांमध्ये कायम राहिले व त्यातून निर्माण झालेली असंख्य गाणी रसिकांच्या मनात रेंगाळत राहिली. अशी खास अंदाजातील रोमांस, प्रणय व विरहाची अनुभूती देणारी एकल व युगल गाणी गायकांनी सुरेल स्वरात सादर केली.‘ये दुनिया उसी की..., ये चाँद सा रोशन चेहरा..., तुम मुझे युं भुला ना पाओगे..., ऐ गुलबदन..., सुभान अल्ला हंसी चेहरा..., मेरी मोहब्बत जवा रहेगी..., छुपने वाले सामने आ..., ओ मेरे सोना रे सोना रे..., बडे है दिल के काले..., सरपर टोपी लाल हाथ मे रेशम का रूमाल..., इशारो इशारो मे दिल लेने वाले..., आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे..., दिन सारा गुजरा तेरे अंगना...’ अशी सदाबहार गाणी कलावंतांनी सादर केली. महेंद्र ढोले (कि-बोर्ड), अशोक टोकलवार (तबला), नंदू गोहणे (ऑक्टोपॅड), अमर शेंडे (व्हायोलिन), राजेश धामणकर (तुंबा-कोंबो), प्रसन्ना वानखेडे (गिटार), राजू गजभिये (ड्रम्स), अमित हत्तीठेले (सेक्सोफोन), उज्ज्वला गोकर्ण (सहताल) यांनी साथसंगत केली. निवेदन श्वेता शेलगावकर यांचे होते.
तुम मुझे युं भुला ना पाओगे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:26 AM
श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी अनेक दिग्गज अभिनेत्यांना स्वरसाज प्रदान केला आहे. त्यातील आवर्जुन उल्लेख करावा असे नाव म्हणजे शम्मी कपूर. आपल्या अनोख्या हावभावासह अभिनयाने दर्शकांमध्ये खास पसंती मिळालेले शम्मी कपूर यांच्यासाठी रफीसाहेबांनी गायलेल्या गीतांनी श्रोत्यांवर जादू केली. त्या गीतांचे माधुर्य रसिकांनी बुधवारी अनुभवली.
ठळक मुद्देमोहम्मद रफींनी शम्मी कपूरसाठी गायलेल्या गीतांची नागपुरात मेजवानी