कारण अज्ञात : उलटसुलट चर्चेला उधाणनागपूर : दिघोरीतील एका तरुण दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री घडली. नौशाद (वय २८) आणि रोहिणी नौशाद डोनाडकर (वय २४) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली ते स्पष्ट होऊ शकले नाही.पोलिसांच्या माहितीनुसार, डोनाडकर दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना अद्विती नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. नौशाद फॉर्मासिस्ट होता. तर, रोहिणी गृहिणी होती. दिघोरीतील सुफी प्लाझामधील फ्लॅट नं. एस-७ मध्ये राहायचे. गुरुवारी दुपारी ते सहनिवाशांना घरीच दिसले. मात्र, रात्री ८ वाजले तरी त्यांच्या सदनिकेतून कसलाही आवाज येत नसल्यामुळे बाजूच्यांची कुजबुज वाढली. शेजारी गोळा झाले आणि त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले. पाहतात तर दोघेही सिलींग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. रोहिणीने ओढणीने तर नौशादने दुपट्ट्याने सिलींग फॅनला गळफास लावला होता. या घटनेमुळे दिघोरी परिसरात खळबळ निर्माण झाली. या सुखवस्तू दाम्पत्याने हा टोकाचा निर्णय का घेतला, त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे शेजारी सांगतात. त्यामुळे त्यांनी घरगुती वादातूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. घटनेच्या वेळी त्यांची मुलगी अद्विती ही गडचिरोलीला आजीकडे होती, असे समजते. दरम्यान, या दोघांनी एकाच वेळी आत्महत्या केली की प्रारंभी एकाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पाहून दुसऱ्याने आत्महत्या केली, की अन्य कोणता प्रकार या दुहेरी आत्महत्येच्या घटनेमागे आहे, ते स्पष्ट झाले नाही. रेवती सचिन वैरागडे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)एकमेकांवरील संशयामुळे ?डोनाडकर दाम्पत्याच्या शयनकक्षात पोलिसांना एक डायरी मिळाली. त्यातील काही मजकुरातून आणि उपलब्ध परिस्थितीवरून ही दुहेरी आत्महत्या ‘संशयकल्लोळातून’ घडल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे. नौशाद आणि रोहिणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोघेही एकमेकांवर संशय घेत असावे, त्यातून त्यांचा गुरुवारी वाद झाला असावा आणि त्यातूनच ही घटना घडली असावी, असा संशय आहे.
दिघोरीत तरुण दाम्पत्याची आत्महत्या
By admin | Published: April 04, 2015 2:19 AM