लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील अब्दुल्लाशहा बाबा दर्गा चित्तरंजन झोपडपट्टी परिसरात शनिवारी (दि. १७) रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या मारहाणीतील गंभीर जखमी तरुणाचा शनिवारी (दि. २४) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या काळात पाेलिसांनी आराेपींना अटक केली नाही. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा नाेंदवून आराेपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी मृताच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी कामठी (नवीन)चे ठाणेदार विजय मालचे यांना निवेदन दिले.
विशाल चरण धुर्वे (२५, रा. चित्तरंजन नगर, झोपडपट्टी, कामठी) असे मृताचे नाव आहे. अवैध धंद्यातून विशालचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले हाेते. त्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सात आराेपींनी विशालला शनिवारी (दि. १७) रात्री चित्तरंजन नगरातील अब्दुल्लाशहा बाबा दर्गासमाेरील राेडवर पकडले आणि बेदम मारहाण केली. यात गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी त्याला सुरुवातीला कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. तिथे शनिवारी (दि. २४) सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणात कामठी (नवीन) पाेलिसांनी सात जणांविरुद्ध भादंवि ३०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. मात्र, आठवडाभरात एकाही आराेपीला अटक केली नाही. त्यातच विशालचा मृत्यू झाल्याने त्याची आई कल्पना, बहीण कविता, पत्नी पूजा, इतर नातेवाईक व नागरिकांनी सकाळी ११ वाजता पाेलीस ठाणे गाठले आणि ठाणेदार विजय मालचे यांना निवेदन देऊन खुनाचा गुन्हा दाखल करून आराेपींना अटक करण्याची मागणी रेटून धरली.
...
मृतदेह स्वीकारण्यास नकार
ठाणेदार विजय मालचे यांनी मृत विशालच्या कुटुंबीयांची चर्चा केली. आराेपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाण पथके रवाना केली आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे विशालचे कुटुंबीय घरी परत गेले. दुसरीकडे, कामठी (नवीन) पाेलीस या प्रकरणात जाेपर्यंत खुनाचा (भादंवि ३०२) गुन्हा दाखल करत नाही, ताेपर्यंत विशालचा उत्तरीय तपासणी झालेला मृतदेह स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पाेलिसांसमाेर नवा पेच निर्माण झाला. यावर रात्री उशिरापर्यंत ताेडगा निघाला नव्हता.