मेंढला : पायाला झालेल्या जखमेचा त्रास असह्य झाल्याने तरुणाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बानाेर (चंद्र) येथे रविवारी (दि. २२) सकाळी घडली.
अर्जुन सुखदेव धुर्वे (२४, रा. बानाेरचंद्र, ता. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. अर्जुनची शेती जंगलालगत असून, शेतात वन्यप्राण्यांचा वावर आहे. वन्यप्राणी त्याच्या शेतातील पिकाची नासाडी करीत असल्याने ताे पिकाचे रक्षण करण्यासाठी राेज रात्री शेतात जायचा. एक दिवस अंधारात त्याच्या पायाला जखम झाली. उपचार करूनही ती जखम बरी न हाेता वाढत गेली. त्या जखमेचा त्रास असह्य झाला हाेता.
त्यातच ताे रविवारी सकाळी शेतात गेला. शेतात कुणीही नसताना त्याने फवारणीचे विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्याची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला लगेच मेंढला (ता. नरखेड) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली गजभिये यांनी तपासणीअंती त्याला मृृत घाेषित केले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास संजय इंगोले व शरद घोरमाडे करीत आहेत.
...
वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करा
मेंढला परिसरातील प्रत्येक गावात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, ते पिकांची प्रचंड नासाडी करते. यातून अप्रत्यक्षरीत्या अर्जुनला दुखापत झाली आणि त्याने आत्महत्या केली. वनविभाग या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारणार काय, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा अथवा त्यांची शिकार करण्याची रीतसर परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.