लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - बुकींनी रक्कम वसुलीसाठी घरच्यांना फोन करून दडपण वाढवल्याने एका व्यापारी कुटुंबातील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. संचित अजय अग्रवाल (वय २६) असे मृताचे नाव आहे. तो एचबी टाऊनमधील श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहत होता.
संचितचे वडील ग्रेनाईटचा व्यवसाय करतात तर भाऊ स्क्रॅप व्यापारी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संचितला किक्रेट सट्ट्याचा शाैक होता. यात त्याने जवळची बरीचशी रक्कम गमावली होती. नंतर त्याने बुकींकडून उधारी घेऊन सट्टा लावला होता. रक्कम थकीत असल्याने बुकींनी संचितकडे तगादा लावला होता. तो रक्कम देत नसल्याने बुकींनी त्याच्या घरच्यांना फोन करून वसुलीसाठी दबाव वाढवला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, एका बड्या बुकीने संचितच्या नातेवाईकाला फोन करून रकमेची व्यवस्था करा नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचे समजते. त्यामुळे संचितला शनिवारी सकाळी त्याचे कुटुंबीय सोबत घेऊन बसले. समाजकंटकांचे पैशासाठी घरी फोन येत आहेत, हे चांगले नाही. तू कशाला रक्कम उधार घेतो, अशी विचारणा करून घरच्यांनी त्याला कामधंदा करून सेटल होण्याचा सल्ला दिला. मात्र, बुकी आता घरच्यांना पैशासाठी फोन करत असल्याचे कळाल्याने संचितवर प्रचंड दडपण आले. त्यामुळे त्याने आपल्या शयनकक्षात जाऊन सिलींग फॅनला शॉल बांधून गळफास लावून घेतला. दुपार झाली तरी तो शयनकक्षातून बाहेर आला नसल्याचे पाहून घरच्यांनी त्याला आवाज दिले. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने घाबरलेल्या घरच्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता संचित गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. पारडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---
रविवारी दिवसभर बुकींच्या वर्तुळात संचितच्या आत्महत्येच्या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू होती. वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास बुकीबाजार आणि आत्महत्येच्या विचारात असलेल्या अनेक बड्या घरच्या व्यक्तींची माहिती उजेडात येऊ शकते.
---