पारशिवनी : शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी शिवारात १८ जून राेजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
पंकज शंकरराव भुर्रे (३०, रा. उमरी, ता. पारशिवनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत पंकज हा शेतमजुरीच्या कामासाठी राहुल ढाेरे यांच्या शेतात गेला हाेता. शेतातून गेलेल्या ११ के.व्ही. विद्युत वाहिनीची एक ता. बाजूच्या शेतातील सागवानाचे झाड पडल्याने शेतात तुटून पडली असता, ती पीव्हीसी पाईपने बाजूला करताना पंकजला विजेचा जबर धक्का लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आराेपी लाईनमन चंद्रभान दत्तूजी खैरे (५२, रा. महावितरण कार्यालय, मनसर) यांना सदर विद्युत ता. तुटल्याची माहिती मिळूनसुद्धा त्यांनी कर्तव्यात कसूर केला. लाईनमनच्या निष्काळजीपणामुळे पंकजचा जीव गेल्याचे पाेलीस चाैकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी आराेपी लाईनमनविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक नागुलवार करीत आहे.