हिंगणा (नागपूर) : तलावात पाेहण्यासाठी उतरल्यानंतर तरुण पाण्यात माैजमस्ती करू लागले. त्यातच एक तरुण खाेल पाण्यात गेला आणि बुडाला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बाेरगाव (ता. हिंगणा) शिवारातील तलावात बुधवारी (दि. २८) सायंकाळी घडली. गुरुवारी (दि. २९) सकाळी तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
पवन दिलीप गुंडावार (वय २२, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन बुधवारी सायंकाळी त्याच्या घराजवळच्या काही मित्रांसाेबत सावंगी (ता. हिंगणा)लगतच्या बाेरगाव तलावाजवळ फिरायला आला हाेता. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सर्व जण पाेहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात माैजमस्ती करीत असताना पवन खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. काही वेळातच ताे बुडाल्याने मित्रांनी आरडाओरड केली.
माहिती मिळताच सहायक फाैजदार वसंत शेडमाके, हवालदार विनायक मुंडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठत एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांनी पाण्यात पवनचा शाेध घेतला. अंधारामुळे बुधवारी सायंकाळी बंद केलेले शाेधकार्य गुरुवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. त्यातच सकाळी ९ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी पवनचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी दिलीप गुंडावार यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.