लाेकमत न्यूज नेटवर्क
नांद : जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी तरुणाला विश्वासात घेत मजूर म्हणून लाकडे ताेडण्यासाठी जंगलात नेण्यात आले. वाटेत वाद उकरून काढत त्याच्यावर चाकूने हल्ला चढविण्यात आला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सालेभट्टी (चाेर) शिवारात शनिवारी (दि. २) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
बाळकृष्णा जागेश्वर लेदाडे (वय ३५) असे जखमीचे, तर सुरेश कुशाब उरकुडे (दाेघेही रा. सालेभट्टी, ता. भिवापूर) असे आराेपीचे नाव आहे. सुरेश मूळचा जवळी, ता. भिवापूर येथील रहिवासी असून, त्याचे सालेभट्टी येथे दुकान अल्याने ताे सालेभट्टीलाच राहायला आला. दाेघेही मित्र असून, शनिवारी विजेचे बिल भरण्यासाठी नांद (ता. भिवापूर) येथे आले हाेते. सुरेशने बाळकृष्णाला माेटरसायकलने त्याच्या गावाजवळ साेडले. त्याने माेटारसायकल घरी ठेवली व बाळकृष्णाला विश्वासात घेत त्याला स्वयंपाकाला लाकडे आणण्यासाठी जंगलात चालण्याची विनंती केली. त्यामुळे दाेघेही दुपारी जंगलाच्या दिशेने पायी निघाले.
वाटेतच सुरेशने त्याच्याशी चार महिन्यांपूर्वीच्या भांडणावरून बाळकृष्णाशी वाद घालायला सुरुवात केली. दाेघेही निर्जन ठिकाणी झाड ताेडण्यासाठी थांबले. त्यातच काही कळण्याच्या आत सुरेशने बाळकृष्णाच्या मानेवर चाकूने वार केला. हातून चाकू सुटल्याने त्याने बाळकृष्णावर कुऱ्हाड उगारली. मात्र, बाळकृष्ण जखमी अवस्थेत गावाच्या दिशेने पळत सुटला. गावात येताच नागरिकांनी त्याला नांद येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी भादंवि ३२४ गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक फाैजदार प्रकाश आलम करीत आहेत.